औरंगाबाद : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यास चोरट्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. या घटनेत 25 वर्षीय पतीचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्नी गंभीरपणे जखमी झाली आहे. तिची रुग्णालयात मृत्यशी झुंज सुरु आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खांबाला फाटा वस्तीवर ही घटना घडली. (Thief Attacked on Newlyweds couple In Vaijapur Aurangabad)
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की मग या मागे काही दुसरे कारण होते? हे शुक्रवारी दुपारपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. राजेंद्र जिजाराम गोरसे वय 25 वर्षे, असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मोहिनी राजेंद्र गोरसे (वय-24 वर्षे) असं मृत्यूशी झुंज देत असलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
गुरुवारी रात्री सर्व परिवाराने सोबत जेवण केले. त्या नंतर राजेंद्र आणि तिची पत्नी मोहिनी दोघेही त्यांच्या खोलीत गेले तर राजेंद्रचे आई-वडील आणि बहीण असे तिघे दुसऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दरम्यान मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी पहिल्यांदा बाजूच्या खोलीत झोपलेल्या राजेंद्रच्या आई-वडिलांच्या खोलीला बाहेरून कडी लावली. आणि नंतर राजेंद्र यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश केला. दरम्यान राजेंद्र आणि त्यांच्या पत्नी झोपेतून जागे झाले. दोघेही समोर येताच आरोपींनी या नाव दाम्पत्यास लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यात राजेंद्र रक्तबंबाळ होऊन जागीच मृत पावले तर मोहिनी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. मात्र आई-वडिलांच्या आरडाओरडीने गावकरी धावत त्यांच्या घराकडे येत होते. ते पाहून आरोपींनी धूम ठोकली.
गावकऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात अक्षरशः रक्ताचा सडा पडल्याचे पाहून गावकारीही घाबरले. त्यांनी तातडीने आई-वडिलांची बंद खोलीतून सुटका करीत पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर DYSP कैलास प्रजापती, वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजपूत यांचं पथक घटनस्थळी आले. त्यांनी लगोलग श्वान पथकाला पाचारण केले.
जखमी मोहिणीला रात्री वैजापूर रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर होत चालल्याने तातडीने औरंगाबादेत हलविण्यात आले. सध्या मोहिनीवर औरंगाबादच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
राजेंद्र आणि मोहिनी यांचं सहा महिन्यांपूर्वीच लॉकडाऊनच्या काळात लग्न झालं होतं. होतकरु तरुण म्हणून त्याची गावात ओळख होती. राजेंद्र घरातील कर्ता तरुण होता. भावी आयुष्याची अनेक स्वप्नं नवदाम्पत्यांनी रंगवील होती. मात्र एका हल्ल्याने होत्याचं नव्हतं झालंय.
(Thief Attacked on Newlyweds couple In Vaijapur Aurangabad)
हे ही वाचा :
अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून तब्बल 5 तास कसून चौकशी
खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!