मध्यरात्री दुकान फोडलं, गल्ल्यात असतील तितके पैसे घेतले, हजारो रुपयांच्या सिगारेटचे पाकीटे पळवले, पण….
दुकानाचे शटर उचकवून हजारो रुपये किंमतीचे सिगारेटचे पाकिट चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
धुळे : दुकानाचे शटर उचकवून हजारो रुपये किंमतीचे सिगारेटचे पाकिट चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या चोराचं नाव भिका सदू भोई असं आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याने साईराम ट्रेडर्स या दुकानातून 40 हजार 150 रुपयांचे सिगारेटची पाकिटे लांबविली होती. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपासासाठी एलसीबीने त्याला देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
देवपुरात दत्त मंदिर चौक परिसरात नवतेज बाजार आहे. या बाजाराच्या वरच्या भागात वाडीभोकर गावातील जैतोबा नगरात राहणारे योगेश चिंचोले यांचे ओम साईराम नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानाच्या माध्यमातून किराणाची होलसेल विक्री होत असते. चिंचोले हे आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद करुन घरी गेले होते. ते सोमवारी (18 ऑक्टोबर) सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकान उघडे असल्याचे दिसून आले. संबंधित प्रकार बघितल्यानंतर योगेश यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
चोरट्याने चोरी कशी केली?
चोरट्याने दुकानाच्या शटरच्या खालच्या भागाची पट्टी कापून शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने गल्ल्यातील रोख रकमेसह सिगारेटची पाकिटे असा एकूण 40 हजार 150 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी योगेश चिंचोले यांनी देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर समांतर तपास सुरु झाला होता.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद
चोरी झालेल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटा कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तो त्यात कैद झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांकडून आणखी जलदगतीने तपास सुरु झाला. गोपनीय माहिती संकलित करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण तपासण्यात आले असता तो भिका सदू भोई असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याला घरच्या मंडळीसमक्षच बेड्या ठोकल्या. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, कर्मचारी रफिक पठाण, राहूल सानप, गौतम सपकाळे, योगेश चव्हाण, राहूल गिरी, सचिन पाटील यांनी केली.
चोरीचा माल विक्रीसाठी गेल्या अन् औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात फसल्या
दुसरीकडे औरंगाबाद शहरातील वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) येथील एका कंपनीत चोरी केलेले साहित्य भंगाराच्या दुकानात विक्रीसाठी गेलेल्या चार महिला चोरांना सोमवारी वाळूज पोलिसांनी (Aurangabad police)सापळा रचून जेरबंद केले. या चार महिलांकडून 30 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. संदीप भीमराव साळवे यांची वाळूज एमआयडीसीतील के सेक्टरमध्ये पूजा एंटरप्रायजेस कंपनी आहे. 13 ऑक्टोबरला मध्यरात्री चोरट्यांनी या कंपनीतून लोखंडी अँगल, चॅनल, शीट आदींसह जवळपास 30 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. या घटनेनंतर त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला.
हेही वाचा :
पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, महिला मालकासह दोघे अटकेत, चौघींची सुटका
पत्नीचे इतरांशी संबंध, सासूने दोन नवऱ्यांना ठार मारलं, व्हिडीओत गंभीर दावे करत पतीची आत्महत्या
आर्यन खानची केस फेक, मुंबईत दहशत माजवण्याचा-खंडणीचा धंदा सुरुय, सर्वांचे पुरावे देणार : नवाब मलिक