Dombivali Theft : डोंबिवलीत चोरट्यांचा हैदोस, एकाच रात्रीत सोनाराची दोन दुकानं फोडली; घटना सीसीटीव्हीत कैद
डोंबिवली पश्चिम येथील चिंचोली पाडा परिसरात मुख्य रस्त्यावर रायकर ज्वेलर्स आणि बालाजी ज्वेलर्स ही दोन दुकाने आहेत. या दुकानांमध्ये पहाटेच्या दरम्यान एका सराईत चोट्याने समोरून दुकानाचे शटर उचकून दुकानाच्या आत प्रवेश केला.
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम येथील चिंचोली पाडा परिसरात एकाच रात्री दोन ज्वेलर्सची दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या दरम्यान घडली आहे. रायकर ज्वेलर्स, बालाजी ज्वेलर्स अशी अशी लुटण्यात आलेल्या दुकानांची नावे आहेत. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरांनी दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही आणि डीव्हीआरही चोरुन नेला आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावर असलेल्या या दोन्ही दुकानांचे समोरून शटर उचकून फोडल्याने पोलीस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, डोंबिवली परिसरात ज्वेलर्स व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दुकानाचे शटर उचकून आत प्रवेश केला
डोंबिवली पश्चिम येथील चिंचोली पाडा परिसरात मुख्य रस्त्यावर रायकर ज्वेलर्स आणि बालाजी ज्वेलर्स ही दोन दुकाने आहेत. या दुकानांमध्ये पहाटेच्या दरम्यान एका सराईत चोट्याने समोरून दुकानाचे शटर उचकून दुकानाच्या आत प्रवेश केला.
दुकानातील सोन्यासह सीसीटीव्ही, डीव्हीआरही चोरला
यानंतर दुकानात लावलेले सीसीटीव्ही तोडून दुकानांमधील लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झाला आहे. विशेष म्हणजे या चोराने दोन्ही दुकानांचे शटर उचकटून दुकानातील सोने आणि चांदीसह सीसीटीव्ही आणि डीव्हिआरही चोरून नेला.
याप्रकणणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात चोरीची घटना नोंद करण्यात आली आहे. या चोरट्याला पकडणे पोलिसांसमोर आव्हान आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे.
याआधी दिवसांपूर्वी कल्याणमध्ये दिवसाढवळ्या दरोड्याची घटना
काही दिवसांपूर्वी कल्याणच्या द्वारली गावात एका सोन्याच्या दुकानावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला होता. तर मानपाडा हद्दतील सात ते आठ मेडिकलची दुकाने फोडण्यात आली होती. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.