Pune crime : भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी लांबवले तीन लाखांचे दागिने, सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरला; पुण्यात चोरट्यांचा प्रताप
शनिवारी रात्री ते रविवार सकाळ यादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. मात्र चोरट्यांचा शोध घेणे यासाठी वेळ जाऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात शाळा आणि दुकानाच्या मधल्या भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी दागिन्यांचे दुकान लुटले (Jewelery shop robbed) आहे. ही घटना 30 जुलै रोजी रात्री 8.30 ते 31 जुलै रोजी सकाळी 10.00च्या दरम्यान घडली. न्यू खेमांडे ज्वेलर्स, उंड्री चौक कोंढवा येथून तब्बल 3,11,400 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. पोलिसांनी (Pune police) दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शाळेच्या भिंतीला छिद्र पाडले. दुकानाभोवती रिकामे खोके दिसून आले. तिथे भिंतीला छिद्र पडले होते. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा (CCTV) डीव्हीआर बॉक्सही चोरी करण्यात आला आहे. न्यू खेमांडे ज्वेलर्सचे मालक मलमसिंग राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे ते शनिवारी दुकान बंद करून घरी गेले आणि त्याच रात्री हा प्रकार घडला.
गुन्हा दाखल
तक्रारदाराने म्हटले आहे, की त्यांच्या एकाही कर्मचाऱ्याला दुकानात झोपण्याची परवानगी नाही. शेजारी शाळा असली तरी ती बंदच असते. याचा फायदा चोरट्यांनी घेतला. पोलिसांनी सांगितले, की डीव्हीआरदेखील चोरीला गेला असल्याने सीसीटीव्ही फुटेज गोळा करणे कठीण आहे. त्यामुळे आता फुटेज मिळविण्यासाठी पोलीस त्याच परिसरात लावलेले इतर सीसीटीव्ही पाहत आहेत. पोलीस निरीक्षक जगन्नाथ आनंदराव जानकर म्हणाले, की तक्रारीनुसार आम्ही कलम 454 (गुन्हा करण्यासाठी घर फोडणे), 457 (गुन्हा करण्यासाठी रात्री घर फोडणे) आणि 380 (घरात चोरी) यानुसार एफआयआर नोंदविला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
चोरट्यांनी परिसराची पाहणी केल्याची शक्यता
शनिवारी रात्री ते रविवार सकाळ यादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. मात्र चोरट्यांचा शोध घेणे यासाठी वेळ जाऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले आहे. सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील चोरट्यांनी पळवला आहे. त्यामुळे बाहेरील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. चोरट्यांनी परिसराची पाहणी आधी केली असावी, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. कारण जी शाळा आणि ज्वेलरी शॉपची सामाइक भिंत आहे, तिला भगदाड पाडण्यात आले. ती शाळाही सध्या बंद आहे. याचा गैरफायदा चोरांनी घेतला.