धरणगावात थर्टी फर्स्टचा जल्लोष, वादातून एका कामगाराची हत्या, नेमकं काय घडलं?
झालेल्या वादातून हाणामारी झाली. त्यात लाकडी दांड्याने काळू सोनवणे याच्या डोक्यावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव (Dharangaon) येथील जिनिंग फॅक्टरीमध्ये (Ginning Factory) थर्टी फर्स्टच्या जल्लोषावरून वाद झाला. बिहारी व मराठी कामगारांमध्ये झालेल्या वादातून काळू सोनवणे या मराठी कामगाराची हत्या झाली. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर पसार झालेल्या 10 संशयित कामगारांना (Labor) ताब्यात घेतले आहे. जिनिंग फॅक्टरीच्या आवारात राहणाऱ्या बिहारी कामगारांकडून ताट वाजवून थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा केला जात होता.
ताट वाजवण्यास काळू सोनवणे या कामगाराने बिहारी कामगारांना विरोध केला. यातूनच झालेल्या वादातून हाणामारी झाली. त्यात लाकडी दांड्याने काळू सोनवणे याच्या डोक्यावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली.
गेल्या वर्षाला निरोप देताना जल्लोष करण्यात आला. या जल्लोषातून काही ठिकाणी वाद निर्माण झाले. अशात जळगावातील जिनिंग फॅक्टरीतही जल्लोष सुरू होता. पण, ताट्या वाजविण्यावरून वाद झाला. ताट्या वाजवून थर्टी फर्स्टचा जल्लोष बिहारी कामगार करत होते. मराठी कामगारानं या घटनेला विरोध केला.
विरोध का करतो, यावरून झालेल्या वादात बिहारी कामगारांनी लाकडी दांडे काढले. या लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत काळू सोनवणे याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दहा संशयित बिहारी कामगारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तपास सुरू आहे. कामगारांचा जिनिंग फॅक्टरीत असलेला वाद उफाळून आलाय. बिहारी आणि मराठी कामगार असा छुपा वाद नेहमी सुरू असतो. या वादातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जाते.