शातिर दिमागवाल्या त्या तिघी, 32 कोटींची मालमत्ता, 56 गुन्हे, मोठ्या गुंडांनाही हरवलं, पण..
गोरखपूर जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानंतर या तिन्ही महिलांनी गुन्ह्याद्वारे मिळविलेल्या बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तिन्ही महिलांवर विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांनी जामीन घेतला आहे.
गोरखपूर : उत्तर प्रदेशचे योगी सरकार गुन्हेगार आणि तस्करांचे कंबरडे मोडण्यात व्यस्त आहे. ड्रग्ज तस्कर, भूमाफिया गुंड, किंवा इतर कोणत्याही गुन्ह्यातील गुन्हेगार असो यूपीचे पोलीस प्रशासन या सर्व गुंडांवर आपली पकड घट्ट करत आहे. याशिवाय गुन्हेगारांनी बेकायदेशीरपणे कमावलेली मालमत्ता जप्त करण्याची कारवाईही पोलीस करत आहेत. याच संदर्भात जिल्हा प्रशासनाने गोरखपूरमध्ये ड्रग्ज विक्री आणि तस्करी करणाऱ्या तीन महिला तस्करांची सुमारे 32 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या सर्व मालमत्ता महिला तस्करांच्या मुलाच्या आणि कुटुंबियांच्या नावावर आहेत.
गोरखपूरचे एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितले की, संघटित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हेगारांविरुद्ध वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी जी मोहीम राबिवली आहे. त्याचा हा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या महिला तस्कर राजघाट परिसरात सक्रिय राहून आपले कारनामे करत आहेत. म्होरक्या मंजू देवी, सुधीर निषाद, माला देवी अशी या तीन महिलांची नावे आहेत.
गोरखपूर जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानंतर या तिन्ही महिलांनी गुन्ह्याद्वारे मिळविलेल्या बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तिन्ही महिलांवर विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्याचा प्रयत्न आहे. तर, काही प्रकरणांमध्ये त्यांनी जामीन घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मंजू देवी यांच्याविरुद्ध 22 गुन्हे दाखल
मंजू देवी यांच्याविरुद्ध राजघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीसह विविध पोलिस ठाण्यात एकूण 22 गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये अबकारी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसह प्राणघातक हल्ला आणि इतर अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यांचा मुलगा सुधीर निषाद याच्यावरही विविध पोलीस ठाण्यात 16 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर माला देवी यांच्यावरही 18 गुन्हे दाखल आहेत असे त्यांनी सांगितले.
कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली
जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी जप्तीच्या कारवाई केली. यात त्यांनी बेकायदेशीरपणे बांधलेली घरे, भूखंड आणि शेत जमीन जप्त करण्यात आली. याशिवाय अन्य मालमत्तांचा शोध सुरू आहे. भविष्यातही त्यांच्यावर कारवाई सुरूच राहणार आहे. या कारवाईत पोलीस प्रशासनासह महसूल तहसील सदरचे पथक घटनास्थळी हजर होते, असेही ते म्हणाले.