राजस्थानच्या तुरुंगातून मुख्यमंत्र्यांना फोन, जीवे मारण्याची दिली धमकी
मुख्यमंत्री यांना धमकी आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाने धमकीचा कॉलचे लोकेशन ताबडतोब ट्रेस केले. हा धमकीचा फोन सलवास येथील तुरुंगातून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारागृहात शोध मोहीम राबविली.
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील सलवास येथील तुरुंगातून मुख्यमंत्री भजनलाल यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला आहे. भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची गेल्या 6 महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. मुख्यमंत्री यांना ही धमकी आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाने धमकीचा कॉलचे लोकेशन ताबडतोब ट्रेस केले. हा धमकीचा फोन सलवास येथील तुरुंगातून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारागृहात शोध मोहीम राबविली. धमकी देणारा गुन्हेगार दार्जिलिंगचा रहिवासी आहे. निमो असे गुन्हेगाराचे नाव आहे.
जयपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कैलाश बिश्नोई यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री भजनलाल यांना धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला. सायबर टीमने ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर ट्रेस केला. ही धमकी दौसा येथील सलवास येथील वरिष्ठ तुरुंगातून देण्यात आली होती.
पोलिसांनी कारागृहात शोधमोहीम राबविली. यावेळी दार्जिलिंगचा रहिवासी असलेल्या निमो नावाच्या कैद्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने धमकी दिल्याची कबुली दिली. आरोपी निमो हा पॉक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे. पोलिसांनी कारागृहात शोधमोहीम राबवली तेव्हा निमो याच्याकडून जवळपास अर्धा डझन मोबाईल जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे हे सर्व मोबाईल सक्रिय होते.
आरोपी निमो याला जयपूर पोलीस आता प्रोडक्शन वॉरंटवर अटक करून जयपूरला आणणार आहेत. कारागृहात असताना त्याने धमकी का दिली याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये कैद्याने ‘काही औषध खाल्ल्यानंतर तो भान हरपतो. हे औषध खाल्ल्यानंतरच त्याने फोन कॉल केला होता, असे सांगितले. मात्र, त्याच्या उत्तरावर पोलिसांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान दौसाचे एसपी रंजिता शर्मा यांनी कारागृहातून 10 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल कारागृहात कसे पोहोचले हा मोठा प्रश्न आहे. या प्रकारांची कसून चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री भजनलाल यांना यापूर्वीही जीवे ठार मारण्याची धमकी आली होती. सुमारे 6 महिन्यांपूर्वी त्यांना जयपूरच्या सेंट्रल जेलमध्ये 5 वर्षांपासून बंद असलेल्या पॉक्सो कायद्यातील एका कैद्याने कंट्रोल रूमला फोन करून धमकी दिली होती. मुख्यमंत्र्यांना गोळ्या घालण्याची धमकी त्या कैद्याने दिली होती. मात्र धमकी दिल्यानंतर त्याने मोबाईल बंद केला होता. मात्र, यावेळी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास धमकीचा फोन आला होता.