विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मृत्यूचा बनाव रचला, पोलिसांसमोर नकली आईही आणली पण…
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव करत एलआयसी कंपनीची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई / सुनील जाधव : विम्याची रक्कम मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. मात्र पॉलिसी अधिकारी शहानिशा करण्यासाठी घरी गेले अन् सर्व बनाव उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आठ कोटी रुपयांचा विमान मिळवण्यासाठी एलआयसीला चुना लावण्याच्या तयारीत असताना खऱ्या आईमुळे सर्व बनाव उघडकीस आला. प्रमोद टाकसाळे, अनिल भीमराव लटके आणि विजय रामदास माळवदे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
अटक करण्यात आलेले तिघेही आरोपी मित्र आहेत. आरोपींनी 2015 मध्ये प्रमोद टाकसाळे याच्या नावावर 8 कोटी रुपयांचा एलआयसीचा विमा काढला. यानंतर 2016 मध्ये आरोपींनी प्रमोदचा अहमदनगर येथे अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. यासाठी त्यांनी अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचा मृतदेह मिळवला. यानंतर प्रमोदची नकली आईच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवली.
यानंतर 2017 मध्ये आरोपींनी एलआयसीकडे विम्याची रक्कम मिळवण्यासाठी क्लेम केला. यासाठी सर्व कागदपत्रं जमा केली. कंपनीने 8 कोटीपैकी 2 कोटी विमान मंजूरही केला. मात्र पॉलिसी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यासाठी कागदपत्रांवरील पत्त्याच्या आधारे घरी गेले. मात्र तो पत्ता चुकीचा होता.
अधिकारी मयताच्या कुटुंबीयांचा पत्ता शोधत शोधत त्याच्या घरी पोहचले. अधिकारी टाकसाळे याच्या घरी पोहचले असता त्याची खरी आई घरी होती. अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली असता तिने आपला मुलगा जिवंत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर एलआयसी अधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.
शिवाजी पार्क पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी याआधी अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत? यांच्यासोबत आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का? याचा तपास शिवाजी पार्क पोलीस करत आहेत.