न्यायाधीशांच्या सासूची बेडशीट न बदलणे महागात पडले, कर्मचाऱ्यांना मिळाली ‘ही’ शिक्षा
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सासूला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रयागराज : अलाहाबाद हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या सासूबाईंची बेडशीट न बदलणे स्वरुप राणी नेहरु रुग्णालयातील कामगारांना महागात पडले आहे. कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याप्रकरणी रुग्णालयातील दोन नर्स आणि एका वॉर्ड बॉयला निलंबित करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सासूला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णाच्या बेडवरची बेडशीट घाण असल्याने न्यायाधीशांच्या पत्नीने तेथील कर्मचाऱ्यांना बेडशीट बदलण्यास सांगितले.
कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले
मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बोलण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. न्यायाधीशांच्या पत्नीने पुन्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बेडशीट बदलण्याची विनंती केली. त्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे बेड कव्हर नसल्याचे उत्तर दिले. त्यांना हवे असल्यास ते घरून बेडशीट आणू शकतात, असे सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाबाबत पत्नीने न्यायाधीशांना सांगितले
कर्मचाऱ्यांच्या या उद्धपणाबाबत पत्नीने न्यायाधीशांना सांगितले. यानंतर न्यायधीश स्वतः रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांना चांगलेच खडसावले.
प्राचार्यांनी स्वतः हजर राहून बेडशीट बदलायला लावली
यानंतर प्राचार्यांनी स्वतः संबंधित वॉर्डमध्ये दाखल होत कर्मचाऱ्यांना बेडशीट बदलायला लावली. तसेच अन्य व्यवस्थाही पाहिल्या. या घटनेबाबात प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त केली.