परभणी : परभणीत एकाच दिवशी पाच विविध अपघातात तिघांचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे पाचही घटनांमध्ये दुचाकीस्वार अपघाताचे बळी ठरलेत. अपघातात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवनाथ भगवान सानप, आसाराम सांगळे अशी दोन मयतांची नावे असून तिसऱ्याचे नाव कळू शकले नाही. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करत अधिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पहिला अपघात परभणीच्या जिंतूर जालना महामार्गावर बुधवारी मध्यरात्री घडला. भरधाव ट्रक चालकाने दुचकीवरील एकाला चिरडले. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. ज्ञानेश्वर राठोड आणि प्रमोद राठोड अशी जखमींची नावे आहेत.
जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
दुसरा अपघात जिंतूर-औंढा रस्त्यावर कार आणि दुचाकीमध्ये झाला. या अपघातात दुचकीवरील एक जण ठार झाला. तिसरा अपघात सोनापूर तांडा येथे झाला. ट्रॅक्टर अपघातात एक जण ठार झाला. चौथा अपघात अकोली पुलाजवळ झाला असून, दुचाकी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला.
पाचवा अपघात शेवडी पाटी जवळील रस्त्यावर सायंकाळी 7 च्या सुमारास दुचाकी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.