बीडमध्ये रोंद नदीत तीन जण वाहून गेले, दोन बहिणींसह एका तरुणाचा समावेश
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने, रोंद नदीला पूर आला आहे. याच पुरामध्ये तीन जण वाहून गेल्याची घटना समोर आलीय.
बीड : परतीच्या पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले आहे. पावसामुळे शेतीचे नुकसान झालेच आहे, मात्र जनजीवनही विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर आला आहे. यामुळे पूल, रस्ते वाहून गेले आहेत. सर्वत्र पूरस्थिती (Flood) निर्माण झाली असून, या पुराच्या पाण्यामुळे जीवितहानीच्या घटनाही घडत आहेत. बीड जिल्ह्यातही (Beed district) अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होऊन या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची (Three drowned in river) दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने, रोंद नदीला पूर आला आहे. याच पुरामध्ये तीन जण वाहून गेल्याची घटना समोर आलीय. शिरूर तालुक्यातील भानकवाडी येथील ही घटना असून यात दोन मुलींसह एका तरुणाचा समावेश आहे.
मुलींचे मृतदेह सापडले, तरुण अद्याप बेपत्ता
दरम्यान शोध कार्यानंतर दोन लहान मुलींचा मृतदेह सापडला आहे, तर 30 वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे. मयत मुली या सख्ख्या मबिहणी आहेत. तर 30 वर्षीय साईनाथ भोसले हा तरुण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे.
नदीच्या पाण्यातून घराकडे चालल्या होत्या मुली
भनकवाडी येथे रोंद नदीवर पूल नाही. यामुळे भनकवाडी येथील गावकऱ्यांना नदीच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागते. मयत दोघी बहिणीही शेतावर गेल्या होत्या. शेतातून नदीच्या पाण्यातून त्या आपल्या वस्तीकडे चालल्या होत्या. मात्र नदीतून जात असतानाच अचानक पाण्याचा लोंढा आला आणि मुली वाहून जाऊन लागल्या.
मुलींना वाचवण्यासाठी तरुणाने पाण्यात उडी घेतली
यावेळी तेथे उपस्थित साईनाथ भोसले या तरुणाने मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरले. दोघी बहिणींचा मृ्त्यू झाला तर साईनाथ अद्याप बेपत्ता आहे. यावेळी नदीच्या आसपास असलेले इतर ग्रामस्थही गोळा झाले मात्र पाण्याचा प्रवाह इतका होता की, वाचवू शकले नाही.
ग्रामस्थांकडून वारंवार नदीवर पूल बांधून देण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत.