अहमदाबाद : एका 50 वर्षीय महिलेला तीन युवकांनी मोकळ्या मैदानात शौचापासून रोखलं. त्यावरुन दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये दंगल, हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्याची नोंद झाली आहे. गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील थासरा तालुक्यात धुनादारा गावात ही घटना घडली. संबंधित महिलेला गावातील मोकळ्या मैदानात शौचाला जायच होतं. रविवारी संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत ती थांबली. महिला जेव्हा शौचासाठी म्हणून मैदानात गेली.
त्यावेळी गावातील तीन भाऊ क्रिकेट खेळत होते. “महिलेने तिन्ही भावंडांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन क्रिकेट खेळायला सांगितलं. पण अतुल, गौतम आणि जयेश या तिन्ही भावंडांनी मैदान सोडण्यास नकार दिला. तिघांनी महिलेला शिवीगाळ केली व तिला तिथून पळवून लावलं” असं खेडा पोलिसांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
महिलेच्या कुटुंबियांनी काय ठरवलं?
महिलेने घरी येऊन कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी तिन्ही मुलांच्या कुटुंबाला जाब विचारायच ठरवलं. महिलेचा भाचा विक्रम आणि मनहर तसच दिलीप आणि चुलत भाऊ पारुल हे चिमण बरोबर बोलण्यासाठी गेले. क्रिकेट खेळणाऱ्या तिन्ही मुलांच्या वडिलांच नाव चिमण आहे.
काठ्या, चाकू घेऊन हल्ला
तुमच्या तिन्ही मुलांना क्रिकेट खेळायच होतं, म्हणून त्यांनी माझ्या काकीला प्रातविधीपासून रोखलं, असं विक्रमने चिमणला सांगितलं. चिमणने उलट विक्रमच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. चिमणच्या कुटुंबातील 10 सदस्यांनी काठ्या, चाकू घेऊन विक्रमच्या कुटुंबावर हल्ला केला.
कुठल्या गुन्ह्यांची नोंद झालीय?
यात विक्रम, मनहर, दिलीप आणि पारुल गंभीर जखमी झाले. अन्य गावकऱ्यांनी चौघांची सुटका केली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय. विक्रमच्या तक्रारीवरुन डाकोर पोलिसांनी, हत्येचा प्रयत्न, इजा पोहोचवणे, बेकायद जमाव आणि दंगल अशा विविध कलमांखाली चिमणच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केलाय.