आधी बांधली राखी, नंतर केले लग्न, कॅनाडावरून बोलावून विवाहित प्रियकराने रचला भयानक कट
मोनिका हीच्या मावस भावाने तिला जेव्हा फोन केला तेव्हा फोनवर बॅकग्राऊंडला पंख्याचा आवाज येत होता. त्यावेळी कॅनडात कडाक्याची थंडी होती. म्हणून त्याला संशय आला.
नवी दिल्ली : मोनिका आपल्या मावशीकडे रहायला आली होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या विवाहीत इसमाशी तिची ओळख झाली. त्याने मोनिका हीच्याकडून राखी बांधून घेतल्याने सर्वांनीच त्यांच्या नात्याला पवित्र मानले. त्यानंतर मोनिकाने पुढील शिक्षणासाठी कॅनडा गाठले. मोनिकाच्या मावशीच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या विवाहीत प्रियकराने तिला कॅनडावरून जबरदस्तीने बोलावून घेतले. घरच्यांना वाटले ती कॅनडातच आहे त्यामुळे ते निर्धास्त राहीले..परंतू तिचा असा शेवट होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते.
हरियाणाच्या सोनीपत येथील गुमड गावात आपल्या मावशीकडे मोनिका शिक्षणासाठी आपल्या आई-वडीलांना सोडून राहीली होती. मूळच्या रोहतकच्या बालंद गावाची रहीवासी असलेल्या २२ वर्षीय मोनिकाला खूप शिकायचे होते. त्यामुळे ती मावशीकडे राहत होती. दिल्ली युनिव्हर्सिटीतून मोनिका ग्र्युज्यूशन पूर्ण करीत होती. ग्रॅज्युएशन करताना तिने कंप्युटरचा कोर्सही लावला होता. गुमड येथे मावशीच्या शेजारी राहणाऱ्या सुनील उर्फ शीला याच्याशी तिची मैत्री झाली होती. सुनील तिच्या मावशीकडे दूध आणायला यायचा. विवाहीत सुनील मोनिकाशी दोस्ती वाढवू लागला. मोनिकाने त्याला राखी बांधल्याने कोणी त्याच्यावर संशय घेतला नाही. त्यानंतर मोनिका ५ जानेवारी २०२२ मध्ये बिझनेस मॅनेजमेंटच्या अभ्यासासाठी कॅनडा गेली.
मोनिका कॅनडाला गेल्याने सुनीलला तिची आठवण यायला लागली आणि त्याने तिला २२ जानेवारीला कॅनडावरून परत बोलावले. त्यानंतर त्याने तिला गोड बोलून २९ जानेवारी तिच्याशी गाजियाबाद येथील आर्य मंदिरात लग्न केले. ३० जानेवारीला मोनिका पुन्हा कॅनडाला गेली. त्यानंतर एप्रिल महिन्यात ती परत आली. त्यानंतर सुनील आणि मोनिका वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. त्यानंतर त्यांच्या कशावरून तरी भांडणे झाले आणि मोनिकाला त्याने गन्नौर येथे एका सुनसान जागी नेऊन डोक्यात दोन गोळ्या घालून ठार केले.
पंख्याचा आवाजाने संशय
मोनिका हिच्या हत्येनंतरही तिच्या कुटुंबियांना काही माहिती नव्हते. तिची जून २०२२ मध्ये हत्या झाली होती. कुटुंबियांना एप्रिल २०२२ मध्ये ती भारतात असल्याचा संशय आला होता. मोनिका हीच्या मावस भावाने तिला जेव्हा फोन केला तेव्हा फोनवर बॅकग्राऊंडला पंख्याचा आवाज येत होता. त्यावेळी कॅनडात कडाक्याची थंडी होती. त्यामुळे पंख्याच्या जोरदार आवाजाने त्याला संशय आला. जेव्हा त्याने तिला याबाबत विचारले तर तिने फोन कट केला आणि नंबर ब्लॅकलीस्टमध्ये टाकला.
गृहमंत्र्यांची भेट घेतली
मोनिकाच्या अपहरणाची तक्रार पाच महिन्यानंतर २६ ऑक्टोबर २०२२ मध्ये गन्नौर येथे दाखल केली गेली. सुनीलवर संशय व्यक्त केला गेला. परंतू काही कारवाई झाली नाही. मोनिकाची आई व मावशीने गृहमंत्री अनिल विज यांची भेट घेतली. तेव्हा सूत्रे हलली. मोनिकाची हत्या केल्यानंतर सुनील कारमध्ये मृतदेह घेऊन फार्म हाऊसवर गेला, परंतू एकट्याला खड्डा खणता आला नाही, म्हणून त्याने मजूरांकडून खड्डा खणला आणि तिला पुरल्याची कबुली दिली आहे. सुनील गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गु्न्हे दाखल आहेत.