पोलीस चौकी पेटण्यामागील कारण ऐकून तुम्ही डोक्यालाच हात लावाल, पोलीस चौकी कशी काय जळाली ?
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिटको चौकातील पोलीस चौकीला गुरुवारी पहाटेच्या वेळी आग लागल्याने पोलीस चौकी संपूर्णतः जळून खाक झाली आहे.
नाशिक : नाशिकच्या नाशिकरोड परिसरातील बिटको चौकात आग पोलीस चौकीला ( Police News ) आग लागल्याने जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे ही आगीची घटना घडली असून नाशिकरोड ( Nashik Road Police Post ) पोलीस ठाण्यात आकस्मित जळीताची नोंद करण्यात आली आहे. मात्र, पोलीस चौकीला आग कुणी लावली ? हे धाडस नेमकं कुणी केलं ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. पोलीस चौकीला आग लागण्यामागील कारण समोर आल्याने नाशिकमध्ये जोरदार चर्चा होऊ लागली असून पोलिसांची मात्र यामध्ये डोकेदुखी वाढली आहे.
नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळयाच्या दरम्यान काही पोलीस चौकी तयार करण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात याच पोलीस चौक्या शहरातील वाहतुक पोलिसांना देण्यात आल्या होत्या.
वाहतुक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतांना पोलीस चौकीचा वापर करत असत. पावसाळ्यात असो नाहीतर उन्हाळ्यात या पोलीस चौक्या वाहतुक पोलिसांची महत्वाच्या ठरल्या आहेत.
पण, गुरुवारी पहाटेच्या वेळी बिटको चौक येथील पोलीस चौकीला आग लागून ती जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर पोलीसांनाही मोठा धक्का बसला आहे.
पहाटेच्या वेळी काही गर्दूल्ल्यानी थंडी पासून बचाव करण्यासाठी पोलीस चौकीच्या बाजूला टायर जाळले होते. शेकोटी करून ते थंडी पासून संरक्षण करत होते. पण त्याच वेळी टायर अगदी पोलीस चौकीच्या शेजारी असल्याने चौकीलाही आग लागली.
पोलीस चौकीला आग लागल्याचे पाहून ती विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात लागल्याने गर्दूल्ल्यांनी तेथून धूम ठोकली, दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा निष्कर्ष पोलीसांनी काढला आहे.
नाशिकरोड पोलीसांनी आकस्मित जळीताची नोंद केली असली शहरातील पोलीस चौकयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून चौकशी दरम्यान काय समोर येतं हे पाहणं महत्वाचे असले तरी पोलिसांचा संशय मात्र मद्यपींवर आहे.
याच परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यपी, निराधार, गर्दूल्ले अशा कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यातील बहुतांश लोकं हे कचरा किंवा इतर वस्तु या पोलीस चौकीजवळच आणून टाकतात. त्याच दरम्यान टायर शेकण्यासाठी पेटवलेले असतांना तेथील कचरा पेटून पोलीस चौकीला आग लागली आहे.
पहाटेच्या वेळी ही आग लागल्याचे लक्षात येतात परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यांनी बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पोलीस चौकी आगीत भस्मसात झाली होती.