मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यास विरोध केला, तृणमूल नेत्याची बेदम मारहाण करत हत्या
अफजल मोमीन हे तृणमूल पक्षाचे नेते तसेच कैलाश जी ब्लॉकच्या रथबारी ग्रामपंचायतीचे उपप्रमुख होते. गेल्या अनेक दिवसांपासून काही तरुण या परिसरात मोठ्याने डीजे वाजवत जात होते.
मालदा : मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यास विरोध केला म्हणून संतापलेल्या आरोपींनी तृणमूल नेत्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील मालदामध्ये घडली आहे. अफजल मोमीन असे मृत्यू झालेल्या नेत्याचे नाव आहे. मोमीन यांच्या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. याप्रकरणी मोथाबडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अफजल मोमीन हे तृणमूल पक्षाचे नेते तसेच कैलाश जी ब्लॉकच्या रथबारी ग्रामपंचायतीचे उपप्रमुख होते. गेल्या अनेक दिवसांपासून काही तरुण या परिसरात मोठ्याने डीजे वाजवत जात होते.
डीजे वाजवण्यास विरोध केल्याने हत्या
नेहमीप्रमाणे मंगळवारीही हे तरुण परिसरात मोठमोठ्याने डीजे वाजवत होते. गावकऱ्यांनी विरोध करुनही ते ऐकत नव्हते. तरीही मोठ्याने डीजे वाजवत असल्याने वादाला सुरुवात झाली.
यानंतर काही तरुण पुन्हा डीजे घेऊन रात्री उशिरा गावात आले. गावकऱ्यांनी पुन्हा तरुणांना डीजे वाजवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता जोरदार हाणामारी सुरू झाली. दरम्यान, अफजल मोमीन हे ही तरुणांना शांत करण्यासाठी मध्ये पडले.
रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले
यावेळी या तरुणांनी मोमीन यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मोमीन यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हत्येप्रकरणी 14 जण ताब्यात
मोमीन यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.