मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : गणशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरोघरी गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून सार्वजनिक मित्र मंडळातही उत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. मात्र याच दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना काही लोकांनी एका इसमाला धमकावल्याचे (threat) प्रकरण समोर आले आहे. गणेश मंडळाला वर्गणी म्हणून २५ हजार रुपये देण्यास नकार देणाऱ्या इसमाला धमकावत मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना अटक (3 arretsed)करण्यात आली आहे. साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे साकीनाका येथील खैराणीचा सम्राट – श्री गजानन मित्र मंडळाचे सदस्य आहेत.
उन्सुल्ला चौधरी (वय ५४) असे तक्रारदार इसमाचे नाव असून ते साकीनाका येथील रहिवासी आहेत. ते व्यावसायिक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी आरोपी प्रदिप पांडे, कृष्णा गुप्ता आणि अब्बास शेख यांनी चौधरी यांची साकीनाका पोलीस ठाण्याजवळ रात्री ९ वाजता भेट घेतली. आणि खैराणीचा सम्राट मंडळाच्या गणेशाच्या मूर्तीसाठी २५ हजार रुपयांची देणगी द्यावी, अशी मागणी केली.
‘एवढी रक्कम खूपच मोठी असल्याने मी तेवढे पैसे देण्यास नकार दिला, मात्र त्यानंतर त्यांनी (मंडळाचे कार्यकर्ते) मला दररोज धमकी देण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी खैराणी चा सम्राट – श्री गजानन मित्र मंडळाच्या नावे असलेली ५००० रुपयांची पावती माझ्यासाठी सोडली होती. मी त्यांना माझ्या दुकानात येऊन, देणगीचे पैसे घेऊन जाण्यास सांगितले. मात्र तेव्हा कोणीच आलं नाही’ असे चौधरी यांनी सांगितले.
‘ पण ९ सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ च्या सुमारास मी एका दुकानात गेलो असताना ते तिघे जण आणखी दोन-तीन जणांना घेऊन आले आणि मला (देणगीसंदर्भात) जाब विचारू लागले. वर्गणी म्हणून २५ हजार रुपये दे नाहीतर… अशी धमकीही त्यांनी मला दिली. पण मी एवढे पैसे देण्यास सरळ नकार दिला. त्यानंतर त्या तिघांनीही मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि मारहाणही केली. मी तातडीने साकीनाका पोलिस स्टेशन गाठले आणि एफआयआर नोंदवली ‘ असे नमूद करत चौधरी यांनी आपबीती सांगितली.
चौधरी यांना गणपती मंडळाच्या देणगीसाठी धमकावल्याप्रकरणी आम्ही तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.