Crime : गणपत्ती बाप्पाचं आगमन, सकाळी घरातील तिघांचे मृतदेह, मृतांमध्ये गरोदर महिला, रात्री नेमकं काय घडलं?
कर्जत तालुक्यातील चिकणपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशिर पाडा येथे तिघांची हत्या करण्यात आली आहे. पती,पत्नी आणि एक लहान मुलाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाचा भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर विवाहित महिला ही सात महिन्यांची गरोदर असून त्या आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून कार्यरत आहेत.दरम्यान,घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असताना मध्यरात्री तिघांचे खून झाल्याने कर्जत तालुका हादरला आहे.
नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर चिकणपाडा हे मुस्लिम बहुल गाव असून या गावाला लागून पोशीर पाडा ही हिंदूंची लहानशी वस्ती आहे. त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी कळंब जवळील बोरगाव येथील जैतू पाटील यांनी जमीन खरेदी केली होती आणि त्या ठिकाणी घर बांधून ते कुटुंब राहू लागले. जैतू पाटील यांच्या मदन आणि हनुमंत या दोन्ही मुलांची लग्ने देखील चिकणपाडा मधील पोशिर पाडा येथील घरी झाली आहेत. 13 वर्षापूर्वी जैतू पाटील यांच्या मोठ्या मुलाचे मदन पाटील यांचे लग्न झाल्यानंतर जैतू पाटील हे आपल्या पत्नीसह बोरगाव येथे राहायला गेले. त्यामुळे त्या घरात मदन तसेच त्याची पत्नी मुलगा आणि भाऊ हनुमंत जैतू पाटील असे कुटुंब राहत होते. हनुमंत हा गवंडी काम करायचा तर मदन पाटील याची पत्नी अनिशा या तेथे आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून काम करीत होत्या.
जैतू पाटील यांनी बांधलेले घर हे मदन जैतू पाटील यांचे नावे होते. त्यामुळे वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून देण्यात यावा यासाठी हनुमंत हा आपला भाऊ मदन सोबत सातत्याने वाद घालत होता. यावर्षी त्यांच्या घरात पहिल्यांदा गणपती बाप्पाचे आगमन झाले होते, मात्र हनुमंत जैतू पाटील याने आपल्या पत्नीला माहेरी भडवळ येथे पाठवून दिले होते.
सात सप्टेंबरच्या रात्री त्या दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात होते. सकाळी दहा वाजता नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यात विवेक मदन पाटील या दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी त्यानंतर त्या मुलाच्या आईबाबांची चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्याच नाल्यात अनिशा मदन पाटील यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांनी या कुटुंबाच्या घराकडे धाव घेतली. घरी गेल्यावर सर्वांना धक्का बसला आणि घरात मदन जैतू पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तोपर्यंत नेरळ पोलीस तेथे पोहचले होते. घटनास्थळी काही वेळाने पोलीस उप अधीक्षक धूळदेव टेले हे देखील पोहचले.
सर्व तिन्ही मृतदेह पोलिसांनी शव विच्छेदन करण्यासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून या घटनेचा तपास नेरळ पोलीस करीत आहेत.नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी त्या घरातील चौथा सदस्य असलेल्या हनुमंत जैतू पाटील यास संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने कर्जत तालुका हादरला असून याच पोशीर पाडा मध्ये आठ वर्षापूर्वी कर्जत येथील तरुणाचा खून अनैतिक संबंध यातून झाला होता आणि आजच्या घटनेने त्या खुनाच्या प्रकरणाला पुन्हा उजाळा मिळाला आहे.
मृत महिला अनिशा या सात महिन्यांच्या गरोदर आहेत. तसेच त्या स्थानिक पातळीवर पोशीर ग्रामपंचायत मध्ये आरोग्य विभगाच्या आशा सेविका म्हणून सेवा देत होत्या. अनीशा मदन पाटील यांचे माहेर हे याच चिकणपाडा गावापासून दीड किलोमिटर अंतरावरील माले गावातील आहे. त्या मृत विवाहितेचा भाऊ रुपेश यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात त्यांनी अर्धे घर नावावर करीत नाही म्हणून हनुमंत जैतू पाटील यानेच त्या तिघांना ठार केले असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा उलगडा शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर होण्याची शक्यता आहे