Sangli crime : अंधश्रद्धेतूनच सांगलीतल्या ‘त्या’ 9 जणांना विषारी गोळ्यांचं लिक्विड पाजलं; सोलापुरातल्या मांत्रिकासह दोघांवर गुन्हा दाखल
गुप्तधन मिळत नसल्याने व्हनमोरे कुटुंबीयांनी वारंवार दोघांकडे पैशांसाठी तगादा लावला होता. मात्र गुप्तधन मिळेल म्हणून 20 जून रोजी रात्री संशयितांनी व्हनमोरे यांच्या म्हैसाळ येथील घरामध्ये एक पूजा ठेवली. या पूजेवेळी त्यांनी सर्वांना वेगवगळे विष दिले आणि त्यानंतर ते दोघेही निघून गेले.
सांगली : म्हैसाळमध्ये झालेल्या 9 जणांचे हत्याकांड हे अंधश्रेद्धेतूनच (Superstition) झाल्याचा खुलासा सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केला आहे. यानुसार अंधश्रद्धा अधीनियमाखाली नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर गुप्तधन मिळवून देण्यासाठी संशयितांनी मृताकडून मोठी रक्कम घेतली होती. या पैशाच्या तगाद्यातून दोघा संशयितांनी 9 जणांना विषारी गोळ्यांचे पावडर करून त्याचे लिक्विड पाजून त्यांची निर्घृण हत्या (Murder) केल्याचे समोर आले. या घटनेनंतर 9 जणांनी आत्महत्या केल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. मात्र तिथे सापडलेल्या चिठ्ठीवरून 25 जणांवर सावकारीचा गुन्हा दाखल (Filed a case) केला होता. तपास सुरू असतानाच गुप्त धन मिळवून देतो म्हणून आब्बास महंमदअली बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवसे या दोघांनी वेळोवेळी व्हनमोरे कुटुंबाकडून मोठ्या रकमा दिल्याचे समोर आले.
पैशांसाठी लावला होता तगादा
गुप्तधन मिळत नसल्याने व्हनमोरे कुटुंबीयांनी वारंवार दोघांकडे पैशांसाठी तगादा लावला होता. मात्र गुप्तधन मिळेल म्हणून 20 जून रोजी रात्री संशयितांनी व्हनमोरे यांच्या म्हैसाळ येथील घरामध्ये एक पूजा ठेवली. या पूजेवेळी त्यांनी सर्वांना वेगवगळे विष दिले आणि त्यानंतर ते दोघेही निघून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास एकाच कुटुंबातील या 9 जणांचा विष प्यायल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना प्रथम आत्महत्या असल्याचे वाटले. मात्र यानंतर तपासाची चक्रे फिरवल्यावर या आत्महत्या नसून खून असल्याचे समोर आले.
पूजाविधी करून प्यायला दिले विष
याप्रकरणी सोलापुरातील एका मंत्रिकासह एकास अटक केल्यानंतर गुप्तधन देण्यासाठीच या दोघांनी मृतकाकडून वेळोवेळी पैसे घेतले असल्याचे स्पष्ट झाले. घटनेच्या दिवशी सोलापुरातील मांत्रिकाने पूजाविधी करून त्यांना विष प्यायला दिले होते. तसेच पूजेवेळी कुटुंबाला 1100 गहू हे सातवेळा मोजण्यासाठीही सांगितल्याचे तपासात पुढे आले आहे. हा सर्व प्रकार अंधश्रेद्धेतून झाल्याने आता अंधश्रद्धा कायद्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.