अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे महागात पडले, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा
शौचावरुन अल्पवयीन मुलगी घरी चालली होती. मात्र घरापर्यंत पोहचण्याआधीच तिच्यासोबत जे घडले ते भयानक होते. न्यायालयानेही याची गंभीर दखल घेतली आहे.
कल्याण : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दोघा आरोपींना 20 वर्षे कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. डी. हर्णे यांनी ही शिक्षा सुनावली. अजमत छोटन अली शेख आणि खुर्शीद महंमदइदी आलम शेख अशी दोघा आरोपींची नावे आहेत. कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडीवली गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या खटल्याची सुनावणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. या सुनावणीदरम्यान सर्व साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
मुलीचे अपहरण करुन खोलीत डांबले, मग अत्याचार
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडिता नैसर्गिक विधी करून घराच्या दिशेने जात होती. यावेळी अजमत आणि खुर्शीद या दोघांनी तिला बळजबरीने खेचत नेऊन एका खोलीत डांबले. त्यानंतर तिच्यावर पाशवी बलात्कार केला. यानंतर घडला प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही या नराधमांनी दिली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजमत आणि खुर्शीद या दोघांना पोलिसांनी अटक केली.
तत्कालिन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सहाय्यक सरकारी वकील म्हणून अश्विनी भामरे-पाटील आणि जयश्री बठेजा यांनी कामकाज पाहिले. तर पैरवी अधिकारी हवालदार ए. आर. गोगरकर यांनी या खटल्यात मोलाची मदत केली. अखेर न्यायालयाने या नराधमांना शिक्षा सुनावत त्यांची कारावासात रवानगी केली आहे.