नागपूर / 1 सप्टेंबर 2023 : नागपूरमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. चोऱ्यांचे सत्र सर्वाधिक वाढले आहे. अशी एक धक्कादायक घटना नागपुरमधील सक्करदरा परिसरात उघडकीस आली आहे. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सर्वजण मृतदेह घेऊन गावी चालले होते. याचा फायदा घेत बंद घरात चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या शववाहिकेतून मृतदेह नेण्यात येत होता, त्या शववाहिकेच्या चालकाने मुलाच्या मदतीने ही चोरी केली. याप्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरी प्रकरणी बाप-लेकाला अटक केली आहे. अश्वजित वानखडे आणि नितेश वानखडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
सक्करदरा परिसरात सरकारी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या कल्पना धोंडे यांच्या घरच्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. यामुळे घरातील सर्व कुटुंबीय मृतदेह घेऊन आपल्या मूळ गावी चालले होते. मृतदेह नेण्यासाठी धोंडे यांनी अश्वजित वानखडे याची शववाहिका बुक केली होती. याचा फायदा वानखडे याने घेतला. वानखडे याने आपला मुलगा नितेशला फोन करुन याबाबत माहिती दिली आणि चोरी करण्यास सांगितले.
“कल्पना धोंडे यांच्या कुटुंबात कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. मी शववाहिकेत परिवारासह मृतदेह घेऊन त्यांच्या गावाला चाललोय. घर खाली आहे, चोरी कर” असे वानखडे याने मुलाला सांगितले. यानंतर मुलाने रात्री काम फत्ते केले. यानंतर चोरीची घटना उघड होताच कल्पना घोडे यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी चोरीचा तपास सुरु केला. यावेळी पोलिसांनी घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी अवघ्या चार तासांत या प्रकाराचा छडा लावला असून शववाहिका चालक अश्वजीत वानखडे आणि त्याचा मुलगा नितेश यांना अटक केली.