मासेमारी करायला गेले होते दोघे भाऊ, मात्र घरी परतलेच नाहीत
पंकज हा घरात सर्वात मोठा असून, तो मिळेल ते काम करून घरचा उदरनिर्वाह चालवायचा. लहान भाऊ कृष्णा याला शरीरसौष्ठवची आवड होती. त्याने तालुका स्तरावर अनेक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. दोघेही सख्खे भाऊ असून ते फणसवाडी या आदिवासी पाड्यावर रहायचे.
इगतपुरी / शैलेश पुरोहित (प्रतिनिधी) : मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरात घडली आहे. पंकज काशिनाथ पिंगळे आणि कृष्णा काशिनाथ पिंगळे अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून, अद्याप दोघांच्याही मृतदेहांचा शोध लागला नाही. रात्री अंधार झाल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली होती. सकाळी पुन्हा शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. शहापूर येथील आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले असून ही टीम दोन्ही भावांचा शोध घेत आहे. दोन्ही भावांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पिंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भावाला वाचवायला दुसरा भाऊ गेला अन्…
तालुक्यातील देवळे परिसरातील दारणा नदीपात्रात रविवारी पहाटे आवळखेड येथील दोघे भाऊ मासेमारी करायला गेले होते. यावेळी एक भाऊ पाण्यात बुडू लागला. भावाला बुडताना पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. भावाला वाचवत काठावर आणत असतानाच अचानक दोघेही बुडाल्याचे समजते.
स्थानिकांच्या मदतीने तात्काळ शोधकार्य सुरु केले
दोघे जण बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. काल रात्रीपर्यंत दोघांचा शोध सुरू होता, मात्र दोघेही मिळून आले नाहीत. अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली होती.
आज सकाळी शहापूर येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करत पुन्हा शोधमोहिम सुरु करण्यात आली. मात्र त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही.
फणसवाडी येथील आदिवासी पाड्यावरील रहिवासी
पंकज हा घरात सर्वात मोठा असून, तो मिळेल ते काम करून घरचा उदरनिर्वाह चालवायचा. लहान भाऊ कृष्णा याला शरीरसौष्ठवची आवड होती. त्याने तालुका स्तरावर अनेक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. दोघेही सख्खे भाऊ असून ते फणसवाडी या आदिवासी पाड्यावर रहायचे.
पिंगळे कुटुंबात पंकज आणि कृष्णाच्या पश्चात आई, एक लहान भाऊ, पंकजची पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कमावता मुलगा गेल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.