एका पाठोपाठ लेकी विहिरीत पडल्या, बापानं क्षणाचाही विलंब न करता उडी घेतली पण…
तीन लेकींना घेऊन बाप शेतात काम करायला गेला. काम झाल्यानंतर मोठी मुलगी पाणी भरायला शेतातील विहिरीवर गेली. नंतर जे घडले ते त्यानंतर संपूर्ण गावत शोकात बुडाले.
रायसेन : पाणी भरायला विहिरीवर गेलेल्या मुलीचा पाय घसरला आणि मुलगी विहिरीत पडली. तिला वाचवायला बहिणीने उडी घेतली, मग मुलींना विहिरीत पडलेले पाहून बापाने उडी घेतली. पण अखेर बापाच्या प्रयत्नांना यश आले नाही. विहिरीत बुडाल्याने बापलेकींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही सर्व घटना 7 वर्षाची मुलगी पाहत होती. तिघांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पाणी भरताना मोठी मुलगी पाय घसरुन पडली
सुल्तानगंज पोलीस ठाण्याअंतर्गत टेकापार करणसिंह गावातील शेतकरी रामलाल चढार आपल्या तिन्ही मुलींसह शेतावर कामाला गेला होता. यावेळी शेतावरील विहिरीत पाणी भरताना 11 वर्षाच्या मुलीचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. बहिणीला पडलेले पाहून तिला वाचवण्यासाठी 9 वर्षाच्या मुलीने उडी घेतली. आपल्या मुलींना विहिरीत बुडताना पाहून रामलालने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली.
ग्रामस्थांनी तिघांना बाहेर काढले पण…
वडिल आणि बहिणींना विहिरीत पडलेले पाहून 7 वर्षाची मुलगी जोरजोरात रडू लागली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने मुलीकडे विचारणा केली. मुलीने वडिल आणि बहिणी विहिरीत पडल्याचे सांगितले. यानंतर या व्यक्तीने ग्रामस्थांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेत तिघांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. तिघांचाही बुडून मृत्यू झाला होता.
ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.