कुत्र्याला फिरवण्यावरुन वाद झाला, कुत्रा मालकाने केलेल्या गोळीबारात दोन जण ठार, सहा जखमी
अतिरिक्त डीसीपी अमरेंद्र सिंह यांनी सांगितले की आरोपी राजपाल याला अटक करण्यात आली आहे. त्याची बंदूक आणि लायसन्स देखील जप्त केले आहे.
इंदूर | 18 ऑगस्ट 2023 : कुत्र्याला फिरवायला नेले असताना दुसऱ्या कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी आक्षेप घेतला. कुत्र्याच्या मालकाचा त्यांच्याशी कडाक्याचे भांडण होत शब्दाला शब्द वाढत गेला. त्यानंतर बॅंकेचे गार्ड असलेल्या त्या इसमाने थेट घराच्या छतावरुन आपल्या लायसन्सधारी 12 बोअरच्या बंदुकीने आधी हवेत नंतर बेधडक जमावावर गोळीबार केल्याने दोन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना इंदूर गुरुवारी रात्री घडली.
खजराना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णबाग कॉलनीत कुत्र्याला फिरायला घेऊन गेलेल्या बॅंक गार्ड राजपाल राजावत यांच्या कुत्र्यावर शेजारील कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने राजपाल यांचे माथे भडकले. त्यांनी घरी जाऊन आपली लायसन्सवाली 12 बोअरची बंदूक घेऊन ते छतावर गेले आणि त्यांनी आधीच हवेत दोन राऊंड फायर केले. त्यानंतर जमावावर गोळीबार केला. त्यात राहुल वर्मा ( 28 ) आणि विमल देवकरण ( 35 ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
समोरासमोर घरे
अतिरिक्त डीसीपी अमरेंद्र सिंह यांनी सांगितले की आरोपी राजपाल याला अटक करण्यात आली आहे. त्याची बंदूक आणि लायसन्स देखील जप्त केले आहे. आरोपी आणि मृताची घरे समोरासमोर आहेत. विमल देवकरण याचे सलून असून आठ वर्षांपू्र्वी त्याचे लग्न राहुल वर्मा हीची बहिण आरती बरोबर झाले होते. त्याला दोन मुली आहेत.
असे घडले हत्याकांड
साक्षीदारांनी दिलेल्या माहीतीनूसार आरोपी गार्ड हा बॅंक ऑफ बडोदाच्या सुखलिया शाखेत सुरक्षारक्षक असून घटने दिवशी आरोपी राजपाल त्याच्या कुत्र्याला फिरवित असताना अन्य एक कुत्रा त्याच्या कुत्र्यावर भूंकू लागला. त्यानंतर एका कुटुंबाने त्याबद्दल आक्षेप घेतला. त्यामुळे चिडलेल्या राजपाल याने घरातील बंदूक आणत पहिल्या मजल्यावरुन गोळीबार केला. राहुल आणि विमल यांना गोळ्या लागल्याने त्यांना रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राहुलची पत्नी ज्योती ( 30 ) , सीमा ( 36) , कमल( 50) , मोहीत (21) , ललित ( 40) आणि प्रमोद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.