जालना : जालन्यात( Jalna) एक भयानक घटना घडली आहे. शौचास बसण्याच्या कारणावरून जोरदार भांडण झाले आहे. हे भांडण इतके विकोपाला गेले की आरोपींनी थेट चाकू हल्ला केल्या. यात दोघा मायलेकांचा मृत्यू झाला असून आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये चार ते पाच महिलांचा समावेश आहे.
जालन्यातील एरंडवडगाव शिवारात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ‘घराजवळ शौचास बसू नका, वास येतो’, असे सांगितल्यामुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबावर गावातील जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केला. यात आई व मुलाचा मृत्यू झाला असून वडील व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
जमावाच्या हल्ल्यात सुमन देवीलाल सिल्लोडे (वय, 45) व त्यांचा मुलगा मंगेश सिल्लोडे (वय 25) यांचा मृत्यू झाला आहे. तर, देवीलाल सिल्लोडे (वय 50) व योगेश सिल्लोडे (वय 20) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी हे देवीलाल यांच्या घराजवळ शौचास बसत होते. देवीलाल यांनी घराजवळ शौचास बसत जाऊ नका, असे हल्लोखोर महिला, पुरुषांना सांगितले होते. घराजवळ शौचास बसत जाऊ नका असे देवीलाल यांनी सांगीतल्याचा राग मनातधरुन शुक्रवारी सायंकाळी देवीलाल सिल्लोडे हे तांडावस्तीवरून आपल्या घराकडे जात असताना वस्तीतच राहणाऱ्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला.
अचानक हल्ला झाल्याने घाबरलेल्या देवीलाल सिल्लोडे यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केला. यावेळी देवीलाल यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटूंबिय मदतीसाठी धावून आले. मंगेश व योगेश दोन्ही मुले वडिलांना जमावाच्या तावडीतून सोडवण्यासाठी धडपडू लागले. मुलांच्या पाठोपाठ पत्नी सुमनही आल्या. मात्र, 15-20 जणांच्या सशस्त्र जमावापुढे चौघेही हतबल झाले.
हल्लेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात सुमन आणि मंगेश याचा मृत्यू झाला. तर देवीलाल आणि त्यांचा दुसरा मुलगा योगेश यात गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला करुन आरोपींनी धूम ठोकली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.