ट्रेनच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांना फटका मारुन लुटायचे, पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या
ट्रेनच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल लुटायचे. वाढत्या घटना पाहता पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कंबर कसली आहे.
सुनील जाधव, कल्याण : ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या फटका गँगच्या दोघांना अटक करण्यास अखेर लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. आरपीएफ आणि जीआरपी यांच्या पथकांनी अंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी चार दिवसांपासून सापळा रचला होता. आरोपींकडून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींची अधिक चौकशी सुरु आहे. या गँगचे तीन जण अद्याप फरार असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण रेल्वे स्टेशन ते टिटवाळा रेल्वे स्टेशन दरम्यान लोकल, मेल ट्रेनमधून दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांची शोध मोहिम सुरु केली होती.
पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली
या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, आरपीएफ सीआयबीचे निरीक्षक सुनील शर्मा यांच्यासह आरपीएफ आणि जीआरपी यांनी मिळून 10 पोलिसांचं पथक तयार केले. चोरट्यांची माहिती काढत अंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी चार दिवसांपासून सापळा रचला होता. याच दरम्यान अंबिवली रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकलगत पाच तरुण संशयितरित्या फिरताना दिसून आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले. मात्र याच दरम्यान अंधाराचा फायदा घेत त्यांचे तीन साथीदार पसार झाले.
फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
मोहम्मद अब्बास समीर सय्यद, मोहम्मद अली हुमायून जाफरी अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. या टोळीने अशा प्रकारचे आणखी किती गुन्हे केलेत, याचा पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस त्यांच्या फरार साथीदारांचाही शोध घेत आहेत.