धक्कादायक ! पोलिसच करत होते अंमली पदार्थांची विक्री, सापळा रचून केले अटक
न्यायालयाच्या पोलीस कोठडीनंतर या दोघांकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून अशी गैरकृत्य केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली परीसरात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांची विक्री आणि खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. विविध पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी गुन्हे दाखल होऊन अटक देखील करण्यात आली आहे. मात्र आता अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये खुद्द दोन पोलिसांनाच अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कल्याणच्या बाजरपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.
दोघे चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती
महेश वसेकर आणि रवी विशे अशी ताब्यात घेतलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे दोघे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. हे दोघेही बाजारपेठ परिसरात 921 ग्राम चरस विक्रीसाठी आले असताना अंमली पदार्थ विरोधी पथक ठाणे गुन्हे शाखाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले.
दोघांकडून तीन ते चार लाखांचा मुद्देमाल जप्त
या दोघांकडून 80 हजाराच्या दोन मोटरसायकली आणि 921 ग्रॅम चरस असा एकूण तीन ते चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सध्या दोन्ही आरोपींना अंमली पथक गुन्हे शाखा ठाणे यांनी कल्याण न्यायालयात हजर केले आहे.
आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
न्यायालयाच्या पोलीस कोठडीनंतर या दोघांकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून अशी गैरकृत्य केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.