‘धाकटा अपघातात गेला’ हे कळताच निघाला असता वाटेत थोरल्यावरही काळाचा घाला!
भीषण! एका मागोमाग आलेल्या दोन दुःखद बातम्यांनी संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
उत्तर प्रदेश : धाकट्या भावाचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला आहे, हे कुटुंबीयांना कळलं. लहान भावाच्या मृत्यूची दुःखद बातमी कळताच थोरला भाऊ कार घेऊन पत्नीसह घरातून निघाला. ज्या रुग्णालयात लहान भावाचा मृतदेह ठेवण्यात आला, त्या दिशेने तो कार घेऊन निघाला होता. पण वाटेतच अनर्थ घडला. ज्या कारमधून मोठा भाऊ लहान भावाच्या मृत्यूचं दुःख मनात घेऊन निघाला होता, त्याचाही कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेनं अख्खं कुटुंब हळहळलं. मृत्यू झालेल्या लहान भावाचं नाव दिलीप गौड आहे, तर मोठ्या भावाचं नाव उमाशंकर गौड आहे. अवघ्या काही तासांच्या अंतरानं घरातील दोघा भावांच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.
लहान भाऊ बिहारमध्ये राहायला होता. तर मोठा भाऊ उत्तर प्रदेशात. बिहारमधील जीरादेई मध्ये दिलीप यांचा दुचाकीचा अपघात झाला. ते आपल्या दुसऱ्या एका साथीदारासह दुचाकीवरुन घरी परतत होते. तेव्हा एका अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात दिलीप आणि त्यांच्यासोबत असलेला रामकेवल शर्मा गंभीररीत्या जखमी झाले.
उपाचारादरम्यान, दिलीप गौड यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला रामकेवल शर्मा अजूनही मृत्यूशी झुंजतोय. दरम्यान, दिलीप गौड यांच्या अपघाती निधनाची बातमी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये राहायला असलेल्या त्यांच्या मोठ्या भावाला देण्यात आली.
लहान भावाचा मृत्यू झाल्याचं कळता मोठा भाऊ उमाशंकर गौड कार घेऊन घरातून बिहारला जाण्यासाठी निघाले. पण या प्रवासादरम्यान, त्यांच्या कार टायरचा ब्लास्ट झाला आणि दुर्दैवी घटनेत उमाशंकर यांचाही मृत्यू झाला. भावाच्या अंत्यविधासाठी निघालेल्या भावावरही काळाने घाला घातल्याचं बातमी अवघ्या काही तासांच्या फरकाने आली. हे कळताच गौड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सगळेच हादरुन गेले.
उमाशंकर यांची पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तर त्यांच्या ड्रायव्हरलाही जबर मार लागला आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंगळवारी लहान भावाचा कार अपघातात मृत्यू झाल्याचं कळलं. तर त्यानंतर काही तासाच्या अंतरानेच मोठ्या भावाचाही रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानं अख्खं गाव शोकसागरात बुडालंय.
गौड कुटुंबीय मूळचे छतरपूर गावाचे रहिवासी. या गावातील भगीरथी गौड यांना एकूण पाच मुलं आहे. त्यातील मोठ्या मुलाचं नाव रमाशंकर. त्यानंतर उमाशंकर (वय 65), गौरी, सीताराम आणि दिलीप (वय 45) अशी मुलं. दिलीप सगळ्यात धाकटा. तर उमाशंकर दुसरा. दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने गौड कुटुंबीय खचले आहेत. या कुटुंबासोबत घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय.