मौजमजेसाठी हातातला व्यवसाय सोडला, आता खाणार जेलची हवा, एक चूक कशी नडली ?
त्या दोघांचा चांगला व्यवसाय सुरु होता. पण नशा आणि मौजमजा करण्याची सवय जडली. मग पैसे अपुरे पडू लागले. मग त्या दोघांनी झटपट पैसे कमावण्यासाठी जो मार्ग पत्करला त्यानंतर थेट तुरुंगातच मार्गस्थ झाले.
सुनील जाधव, डोंबिवली : नशा आणि मौजमस्ती करण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा आणि मोटरसायकल चोरणाऱ्या दुकलीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. हे दोघेही हॅण्डल तोडून वाहनांची चोरी करायचे. त्यांची ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली. सीसीटीव्हीच्या मदतीने डोंबिवली रामनगर पोलिसांनी या सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या. श्रीकांत शेडगे आणि विक्रम साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून एक रिक्षा आणि 9 मोटारसायकल हस्तगत करत सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. रामनगर पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना अटक
कल्याण डोंबिवली परिसरात दुचाकी चोरी सोबतच रिक्षा चोरीचं प्रमाणही वाढलं आहे. डोंबिवली पूर्वेकडील बंदिश हॉटेल परिसरात चोळेगाव तलावाच्या दिशेने एक रिक्षा पार्क करुन ठेवली होती. मात्र ही रिक्षा एका अज्ञात चोरट्याने चोरली. यासंदर्भात फिर्यादीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात हा चोरीचा प्रकार कैद झाला होता. याआधारे आणि खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
एक मेकॅनिक तर दुसरा रिक्षाचालक
श्रीकांत शेडगे याला कल्याण पूर्वेतील पिसावली परिसरातून तर विक्रम साळुंखे याला ठाकुर्ली परिसरातून अटक करण्यात आली. श्रीकांत हा मेकॅनिक आहे तर विक्रम हा रिक्षाचालक आहे. या दोघांकडून एक रिक्षा आणि 9 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून, या दोघांकडून 6 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी आपला अधिक तपास सुरू केला असून, यात अजून गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलीस अधिकारी सांगत आहे.