मुंबई / गोविंद ठाकूर : दिवसा गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम करुन रात्री बाईक चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. बोरीवली पश्चिम एमएचबी पोलिसांनी चोरट्यांना गुजरात येथून बेड्या ठोकल्या आहेत. पुनेश वेला कोळी आणि संजय शिवभाई कोळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी मूळचे गुजरातचे आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या चोरट्यांनी आतापर्यंत किती बाईक चोरल्या आणि कोणाला विकल्या याचा तपास सध्या एमएचबी पोलिसांकडून सुरू आहे.
एमएचबी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक बुलेट चोरीला गेली होती. सकाळी बुलेट मालकाने पाहिले तेव्हा गाडी तेथे नव्हती. यानंतर सदर व्यक्तीने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेत बाईक चोरीची तक्रार दाखल केली. यानंतर एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी त्यांच्या पथकासह तपास सुरु केला. पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता चोरटे बाईक घेऊन जाताना कैद झाले होते.
पोलिसांनी सीसीटीव्हीमधील आरोपींचे फोटो काढून आसपासच्या लोकांना दाखवले. यावेळी आरोपी हे गॅरेजमध्ये मेकॅनिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपी आपला मित्र आहे सांगत त्यांचा मोबाईल नंबर मिळवला. मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता आरोपी गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून गुजरातच्या बहादूरगड कच्छ येथून एका आरोपीला बुलेटसह रंगेहाथ अटक केली. तपासात दुसऱ्या साथीदाराला बुलेट बाईक अडवताना अटक करण्यात आली. दुसऱ्या आरोपीकडून जप्त केलेली बुलेट बाईक सांताक्रूझ पोलीस ठाण्यातून चोरीला गेली होती.