कल्याणमध्ये लॉजवर छापेमारी, दोन मुलींची सुटका करत दोन दलाल महिलांना बेड्या ठोकल्या !
दोन अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करुन घेण्यात येत होता. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या आधारे छापा टाकला.
सुनील जाधव, कल्याण : कल्याणमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका लॉजवर छापेमारी करत पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे. मुलींना बळजबरी वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन महिला दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. अंजू नंदकिशोर सिसोदिया आणि सरीता कृपालिनी सिसोदिया अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी दीड लाख रुपयांची रोकडही हस्तगत केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कल्याण पश्चिमेकडील अनिल पॅलेस या लॉजवर छापा टाकला.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला
अनिल पॅलेस लॉजमध्ये दोन महिला बळजबरीने दोन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बातमीची खातरजमा करत बनावट ग्राहक तयार केले. या ग्राहकांनी या दलाल महिलांना फोन करुन मुलींची मागणी केली. यानंतर दलाल महिलांनी मुलींच्या दीड लाख रुपयांची मागणी केली. बनावट ग्राहकाने पैसे देण्याची तयारी दाखवताच महिलांनी ग्राहकाला अनिल पॅलेजमध्ये बोलावले.
बनावट ग्राहकाच्या मदतीने लॉजवर टाकला छापा
ठरल्या वेळेत ग्राहक लॉजिंगमध्ये पोहोचला. त्याने अंजू आणि सरिता यांना दीड लाखाची रक्कम दिली. यावेळी तेथे दोन अल्पवयीन मुली एका खोलीत बसल्या होत्या. ग्राहकाने पोलिसांना इशारा करताच वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने लॉजवर अचानक छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तेथील एका खोलीतून दोन मुलींना दलाल महिलांच्या तावडीतून ताब्यात घेतले. या दोन्ही मुलींना महिला आणि बालकल्याण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणी अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागातील हवालदार मीनाक्षी खेडेकर यांच्या तक्रारीवरुन महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण, अनैतिक व्यापार, बाल न्याय संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.