साताऱ्यातील मन हेलावणारी घटना, बहीण-भाऊ खेळता-खेळता अचानक गायब, शोधासाठी संपूर्ण दिवस पालथा घातला, पण…
साताऱ्याच्या रुई येथील राणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील 4 वर्षांचा चिमुकला आशिष राणे आणि त्याची अडीच वर्षांची बहीण ऐश्वर्या राणे या दोघांचा मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडले आहेत.
सातारा : साताऱ्याच्या रुई येथील राणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील 4 वर्षांचा चिमुकला आशिष राणे आणि त्याची अडीच वर्षांची बहीण ऐश्वर्या राणे या दोघांचा मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आहे. मृतक आशिष आणि ऐश्वर्याचे वडील प्रशांत राणे यांच्यासह सर्व कुटुंबीय शनिवारी दिवसभर मुलांचा शोध घेत होते. अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (29 ऑगस्ट) निरा उजव्या कालव्यात दोन्ही भाऊ-बहिणीचा मृतदेह सापडला.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही खंडाळा तालक्यातील अंदोरी गावच्या हद्दीमध्ये रुई येथे घडली. रुईत वास्तव्यास असेलेल प्रशांत राणे यांचा 4 वर्षाचा मुलगा आशिष राणे आणि त्याची अडीच वर्षाची बहीण ऐश्वर्या राणे हे शनिवारी सकाळी घराबाहेर पडले. ते अंगणात खेळत होते. पण अचानक त्यांचा खेळण्याचा आणि हसण्या-बोलण्याचा आवाज गायब झाला. कुटुंबियांना संशय आला. त्यांनी त्यांचा शोध सुरु केला. पण दोघी भावंड मिळत नव्हती.
स्थानिकांना मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला
राणे कुटुंबियांकडून दिवसभर शोधाशोध सुरु होता. यादरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी त्यांच्या घरापासून काही अंतरावर पाडेगाव हद्दीत तुकाईनगर येथील निरा उजव्या कालव्यात आशिषचा मृतदेह काही स्थानिकांना दिसला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आणखी तपास केला असता ऐश्वर्या या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह पिंपरे बुद्रुक गावच्या हद्दीतील कालव्यात आढळला.
कुटुबियांच्या आक्रोशाने गावकऱ्यांचेही डोळे पाणावले
पोलिसांनी दोन्ही भाऊ-बहिणीचे मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने पाण्याबाहेर काढले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर भाऊ-बहिणीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे आंदोरी रुई भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच राणे कुटुंबियांनी टाहो फोडला. त्यांच्या आक्रोशाने परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांमध्येही पाणी आलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
बॉयफ्रेंड घरात असताना पती घरी आला, नंतर हाहा:कार, दुसऱ्या दिवशी नाल्यात मृतदेह