स्वतःचा व्यवसाय होता, प्रेयसीसोबत दिवाळीनंतर लग्न करणार होता, पण हे स्वप्न अधुरेच राहिले !
सर्व सुरळीत सुरु होतं. करिअरमध्ये सेटल होते. वैयक्तिक जीवनही सुरळीत सुरु होतं. मग असं काय घडलं की तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं.
नागपूर : सांस्कृतिक राजधानी असलेल्या नागपुरमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरात 24 तासात दोन तरुणांनी आपले आयुष्य संपवल्याने एकच खळबळ माजली आहे. राहुल दिलीप वडई आणि हिरामन रामकिशोर साहू अशी दोघा मयतांची नावे आहेत. अचानक त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. राहलु वडई याच्या मृत्यू प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर हिरामन साहू याच्या मृत्यू प्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
मानसिक तणावातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
राहुल वडई या तरुणाचे स्वतःचे सायकलचे दुकान होते. त्याचे एक मुलीसोबत प्रेमसंबंधही होते. दिवाळीनंतर तो प्रेयसीसोबत लग्न करणार होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. यातून त्याने 11 जून रोजी टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काल तरुणाला मेयो रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण नेमका कोणत्या कारणातून तणावात होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
अज्ञात कारणातून कोराडी परिसरात तरुणाने जीवन संपवले
दुसरी घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हिरामन साहू या तरुणाने अज्ञात कारणाने आपले जीवन संपवले. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुणाने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.