डोंबिवलीत रंगपंचमीच्या सणाला गालबोट, क्षुल्लक वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला
दहशत पसरवण्याच्या उद्देशाने एका टोळक्याने शिवीगाळ करत दोन तरुणांना मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डोंबिवली / सुनील जाधव : सर्वत्र रंगपंचमीचा उत्साह असताना डोंबिवलीत मंगळवारी सायंकाळी क्षुल्लक वादातून एका टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण करत डोक्यावर बियरच्या बाटल्या फोडल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओमकार माळी आणि अभिषेक भोईर अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. विष्णुनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दहशत पसरवण्याच्या उद्देशाने या टोळक्याने हा हल्ला केल्याचे बोलले जाते.
टोळक्याने तरुणांना आधी शिवीगाळ केली
ओमकार माळी आणि अभिषेक भोईर हे दोघे डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरात राहतात. काल सायंकाळी हे दोघे सातपूल परिसरातून चालले होते. यावेळी या ठिकाणी काही तरुण तेथे दारु पित बसले होते. या तरुणांनी या दोघांना शिवीगाळ केली. यावर तरुणांनी शिवीगाळ करु नका असे टोळक्याला सांगितले.
हल्ल्यात दोघे तरुण जखमी
याचा राग आल्याने दारु पित बसलेल्या टोळक्याने लाथा-बुक्क्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या. या हल्ल्यात दोघेही तरुण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणांना रुग्णालयात दाखल केले.
मद्यपी तरुणाकडून डॉक्टरला मारहाण
उपचारासाठी गेलेल्या तरुणाला डॉक्टरने दारु प्यायला का विचारल्याचा राग आल्याने मद्यपी तरुणाने मित्राच्या मदतीने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.