Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये चड्डी गँग सक्रिय, दुकानाचं लॉक तोडून पळवले हजारो रुपये

| Updated on: Nov 02, 2023 | 11:32 AM

चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये चड्डी गँग सक्रिय, दुकानाचं लॉक तोडून पळवले हजारो रुपये
Follow us on

उल्हासनगर | 2 नोव्हेंबर 2023 : उल्हासनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस घातला असून दररोज गुन्ह्याच्या नवनवीन घटना कानावर येतच आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असला तरी फारसा फरक पडला नसून त्यामुळे सामान्य नागरिक मात्र जीव मुठीत धरून जगत आहेत.
त्याचदरम्यान नागरिकांची डोकेदुखी वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. शहरात चड्डी गँग सक्रीय झाली असून एका चोराने दुकानाच्या शटरचे लॉक तोडून हजारो रुपये पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

चड्डी गँगच्या सदस्याने दुकानाच्या शटरचे लॉक तोडून आत घुसून हजारो रुपये पळवले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुठे घडली चोरी ?

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या जीन्स मार्केट परिसरात कन्हैयालाल पेशवानी यांचं जीन्स गारमेंट दुकान आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटे हे चड्डीवर आले आणि त्यानी दुकानाच्या शटरचं लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुकानातील कॅश काऊंटरमधून १८ हजारांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पेशवानी यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतल्यानंतर चोरीच्या या घटनेसंदर्भात हिललाईन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

पण उल्हासनगर कॅम्प नंबर ५ परिसरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आणि आता उल्हासनगरात चड्डी गॅंग देखील सक्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला की नाही ? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागला आहे.

उल्हासनगरमध्ये तलवारी नाचवत गुंडांचा हैदोस

दरम्यान शहरातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये गावगुंडांनी भर दिवसा नंग्या तलवारी नाचवत धिंगाणा घालत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गुंडांचा हा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प २ भागांतील हनुमान नगर परिसरात गावगुंडांनी उच्छाद मांडला. भरदुपारी नंग्या तलवारी नाचवत धिंगाणा घालत दहशत निर्माण करण्याची प्रयत्न केला.या गुंडांचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हनुमान नगर परिसरात राहणारा सुमित चौधरी याचा भोला आणि अल्फराज मध्ये वाद झाला. त्यानंतर सुमितने आपल्या वडिलांना याबाबतची माहिती दिली. ते ऐकून सुमितचे वडील उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार करायला जाणार होते. याच रागातून भोळा आणि त्याच्या साथीदारांनी हातात तलवारी घेऊन सुमित आणि त्याच्या मित्रांना धमकावत मारहाण केली. शिवाय या गावगुंडांनी हातात नंग्या तलवारी नाचवत दहशत निर्माण केली,त्यामुळे घाबरून या परिसरातील रहिवाशांनी आपली घरं आणि दुकान बंद केली. दरम्यान या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे,मात्र मुख्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत