उल्हासनगर | 20 ऑक्टोबर 2023 : शहरात (ulhasnagar crime) सध्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लूटमार, चोरी, खिसेकापू यांचा सुळसुळाट झाल्याने शहरातील लोकांच्या त्रासात वाढ झाली असून त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याचदरम्यान पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून त्या दोनही आरोपींकडून चोरीच्या चार बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
होमगार्डच्या तक्रारीनंतर फिरली तपासाची चक्रं
मिळालेल्या माहितीनुसार, एका इसमाने पोलिसांत बाईकचोरीची तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात तपास करताना पोलिसांनी ही कारवाई केली. उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात राहणारा जयेश शिंदे हा तरूण होमगार्ड म्हणून काम करतो. रविवारी त्याने कामाला जाताना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या खन्ना कंपाउंड परिसरात त्याची स्पोर्ट्स बाईक पार्क केली होती. मात्र रात्री कामावरून परत आल्यावर त्याला त्याची बाईक सपाडली नाही. बराच शोध घेऊनही बाईक कुठेच न मिळाल्याने ती चोरीला गेल्याची त्याची खात्री पटली. त्यानंतर त्याने त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासला असता दोन चोरटे त्याची बाईक चोरताना कॅमेऱ्यात कैद झालेले दिसले.
यानंतर जयेशने उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात आरोपींविरोधात चोरीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यांनीही बाईक लावलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दोन मुलांचे चेहरे त्यांना दिसले व त्याच आधारे त्यांनी शोध घेण्यास सुरूवात केली.
अखेर पोलिसांनी त्या दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून शिंदे याच्या बाईकव्यतिरिक्त आणखीही काही बाईक्स जप्त केल्या. त्यांना भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठवले असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.