उल्हासनगर | 14 ऑक्टोबर 2023 : नवरात्रोत्सवाचा सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला. संपूर्ण देश या उत्सवासाठी उत्सुक आहे. दरम्यान उल्हासनगर (ulhasnagar) पोलीसांच्या वतीने नागरिकांना नवरात्रोत्सवानिमित्त अनोखी भेट देण्यात आली आहे. उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात झालेल्या चोरीच्या अनेक प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला.उल्हासनगर पोलीस परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या ८ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेला १ कोटी ११ हजारांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला . यामध्ये मोटरसायकल,रिक्षा, टेम्पो तसेच रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने आणि तब्बल ३२३ मोबाईल्सचा समावेश आहे.
यावेळी पोलिसांनी चोरीचे अनेक गुन्हे उघड केले आणि सापडलेल्या वस्तू त्यांच्या मालकांकडे सुपूर्द करण्यात आल्या. उल्हासनगरच्या टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार आणि पोलीस यांच्या हस्ते हा सगळा मुद्देमाल समारंभपूर्वक परत करण्यात आला.
शेकडो मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने आणि बरंच काही…
यामध्ये ४४ लाख ४८ हजार ६२५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, ६ लाख १६ हजार ६२० रुपये रोख रक्कम, ८ लाख ८२ हजाराची विविध वाहने, ४२ लाख ३ हजार ४९ रुपयांचे एकूण ३२३ मोबाईल इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. सर्व मिळून एकूण तब्बल १ कोटी ४१ हजारांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.
मौल्यवान वस्तू हरवल्यामुळे किंवा चोरीला गेल्यामुळे हे नागरिक हताश झाले होते, त्यांचे मोठे नुकसान झाले. हा मुद्देमाल आपल्याला परत मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी सोडून दिली होती. मात्र पोलिसांनी हा माल जप्त करत ज्याची-त्याची वस्तू त्याला परत दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आमच्या वस्तू परत मिळाल्याने सुखद धक्का बसला, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. तसेच उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात वाहनचोरी, मोबाईल चोरी या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून आरोपींना जरब बसवली जावी, अशी मागणीही केली जात आहे.