पाण्याच्या वादातून भावकी आपसात भिडली, मग पुढं जे घडलं ते भयंकर !
सामायिक विहिरीवर पाणी भरण्यावरुन भावकीत जोरदार वाद झाला. या वादानंतर भावकीतले लोक जोरदार एकमेकांना भिडले. हा वाद विकोपाला गेला अन् त्यातून जे घडलं ते भयंकर.
सांगली / शंकर देवकुळे : पाण्याच्या वादातून सांगलीच्या जत तालुक्यात कोसारी गावात काका-पुतण्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विलास नामदेव यमगर आणि प्रशांत दादासो यमगर अशी मृत काका-पुतण्याची नावे आहेत. सामाईक विहिरीच्या पाण्यावरून भावकीमध्ये झालेल्या हाणामारी दरम्यान हा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे कोसारी गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी जत पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.
पाणी भरण्यावरुन झाला वाद
जत तालुक्यातल्या कोसारी या ठिकाणी यमगर ही भावकी राहते. त्यांच्या शेतामध्ये सामायिक विहीर आहे. या विहिरीमध्ये पाण्याची पाळी कोणाची यावरून सकाळी वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि यातून एका यमगर कुटुंबातील सुमारे दहा ते पंधरा जणांनी विलास शंभर आणि प्रशांत यमगर यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये विलास यमगर आणि प्रशांत यमगर या दोघांची हत्या करण्यात आली.
जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
या हल्ल्यात दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके आणि विजय विलास यमगर जखमी झालेले आहेत. मृत आणि जखमी हे एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत. तर दुसऱ्या यमगर कुटुंबापैकी कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जत पोलिसांनी धाव घेतली. जखमींना जत शहरातल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.