सोलापूर / सागर सुरवसे (प्रतिनिधी) : शेतजमिनीच्या वादातून भावाला अद्दल घडवण्यासाठी काकानेच आपल्या 4 वर्षाच्या पुतणीची हत्या करुन मृतदेह नदीत फेकल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरी आरोपी काकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोदीप धावणे असे आरोपी काकाचे नाव आहे. पुतणीची हत्या केल्यानंतर आरोपी काका फरार झाला. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथे धावणे कुटुंबीय राहतात. आई-वडिल, दोन भाऊ, सून, नात असा धावणे परिवार आहे. धावणे यांची वडिलोपार्जित 16 एकर शेतजमीन आहे. यातील पाच एकर ही मोठा मुलगा यशोधन धावणे याच्या नावे, पाच एकर भाऊ यशोदीप यांच्या नावे तर उर्वरित सहा एकर ही आईच्या नावे आहे.
आईच्या नावावर असलेल्या सहा एकर शेतजमिनीच्या वाटण्या करण्यासाठी आरोपी यशोदीप हा सतत भाऊ यशोधनसोबत भांडत होता. याप्रकरणी गावातील लोकांनी बैठक घेतं त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. याच कारणातून काल सकाळी यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात पुन्हा एकदा भांडण झाले.
यावेळी आईच्या नावावर असलेल्या 6 एकर जमिनीची वाटणी न करण्यात तुम्ही पती-पत्नी जबाबदार असून, आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीप याने यशोधनला शिवीगाळ केली. तसेच तुमचा वंश संपवतो अशी धमकीही दिली. गावातील लोकांनी मध्यस्ती करत दोघांना शांत केले. त्यानंतर यशोधन हे आई आणि पत्नीसह शेतावर निघून गेले.
यशेदीप काही कामानिमित्त बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर घरात मुलगी ज्ञानदा आणि वडील शिवाजी हे दोघे दिसले नाहीत. त्याने वडील शिवाजी यांना फोन केला असता त्यांनी आपण मंदिरात दर्शनासाठी आल्याचे सांगितले. तसे 4 वर्षाची मुलगी घरात झोपली असल्याचेही सांगितले. याच संधीचा फायदा घेत आरोपी मुलीला घेऊन गेला.
मात्र शेतावरुन आई-वडिल घरी परतले तेव्हा मुलगी घरी दिसली नाही. त्यांनी आसपास चौकशी केली असता यशोदीप मुलीला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. यशोधनने तात्काळ यशोदीपला फोन लावून मुलीबद्दल विचारले. यावेळी मी तुझ्या मुलीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिले असे यशोदीपने सांगितले.
हे ऐकल्यानंतर यशोधनने तात्काळ मालिकपेठ येथे धाव घेतली असता मुलगी पाण्यावर तरंगताना दिसून आली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीला पाण्यातून बाहेर काढत तात्काळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेतीच्या वाटणीच्या वादातून चार वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या करणाऱ्या काका विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.