नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील कंझावाला रोडवर तरुणीच्या भयंकर अपघाताने दिल्लीसह संपूर्ण देश हादरुन गेला. अपघाताची घटना वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. एका कारने तरुणीच्या स्कूटीला धडक मारल्यानंतर 12 किमी तिला फरफटत नेले. यात तरुणीच्या अंगावरील कपडे फाटली, चामडी निघाली. यानंतर अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंजली असे मयत तरुणीचे नाव असून ती इव्हेंट कंपनीत काम करत होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि भावंडांमध्ये मोठी असल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर होती.
अंजलीच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. तिच्या आईच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती. चार बहिणी आणि दोन भावांचीही जबाबदारी अंजलीच्या खांद्यावर होती.
अंजलीकडे स्वतःचे घरही नव्हते. यामुळे तिचे कुटुंबीय तिच्या मामाच्या घरी राहत होते. अंजली एका इव्हेंट कंपनीत नोकरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. कामावर जाण्यासाठी तिने लोन काढून एक स्कूटी घेतली होती.
रविवारी रात्री घरी परतत असताना कंझावाला येथे अंजलीच्या स्कूटीला एका कारने धडक दिली. कारने धडक दिल्यानंतर अंजलीला 12 किमीपर्यंत तिला फरफटत नेले. या घटनेत अंजलीच्या अंगावरील कपडे फाटले. तिच्या शरीरावरची चामडीही निघाली होती. यानंतर तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत रस्त्यावर पडून होता.
ही सर्व भयानक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहता कारच्या पुढच्या चाकात तरुणी अडकली होती. कारमधील सर्व तरुण दारुच्या नशेत असल्याने त्यांना तरुणी कारच्या चाकात अडकल्याचे कळले नाही. जेव्हा त्यांना कळले तेव्हा ते मृतदेह तेथेच सोडून पळून गेले.
याप्रकरणी पोलिसांनी कारमधील पाचही मद्यधुंद आरोपींना अटक केली आहे. दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्ण, मिथुन आणि मनोज मित्तल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.