कुशीनगर : लग्नानिमित्त आयोजित हळद समारंभावेळी एकामागून एक विहिरीत पडून 13 महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कुशीनगरमध्ये (Kushinagar) हा प्रकार घडला होता. आता एका बाजूला एक 13 सरणं रचून या महिलांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विहिरीवरील जाळीवर महिला उभ्या राहिल्याने ती तुटून पडली होती. त्यासोबतच एकामागून एक 13 जणी विहिरीत कोसळल्या होत्या. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात घडलेल्या या भीषण घटनेमुळे एकच हाहाःकार उडाला होता. काल जिथे हळद लागत होती, आज तिथेच स्मशानकळा पसरली आहे.
नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरु होता. बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विहिरीभोवती नाचगाणं सुरु होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याच वेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्या. मात्र महिलांच्या वजनाने पातळ लोखंडी जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक विहिरीत कोसळल्या. आनंद आणि जल्लोषाचं वातावरण बघता बघता चित्कारांमध्ये पालटलं.
लांबलचक शिडी घेऊन खाली पडलेल्या महिलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले, असे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील तरुणांनी विहिरीत उड्या मारुन महिलांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने टॉर्चचा उजेड पडल्यानंतर अनेक जणी विहिरीत पडल्याचे दिसून आले. यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
#UPDATE | Visuals from the spot where 13 women lost their lives during a wedding event last night. pic.twitter.com/E067gsiRFt
— ANI (@ANI) February 17, 2022
पोलिसांनी प्रयत्न करुन अग्निशमन दलाला पाचारण केले. विहिरीत पाईप टाकून पंप बसवण्यात आला. विहिरीतील पाणी काढल्यानंतर एकूण 23 जण पडल्याचे दिसून आले. सर्वांना रुग्णालयात पाठवण्यात आले. यापैकी 13 जणींचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महिलांची ओळख पटायला वेळ लागेल, असे सांगितले जाते.
दुसरीकडे, खासदार विजय दुबे, आमदार जटाशंकर त्रिपाठी यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली आहे. बचावकार्य सुरुच आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :