नवरदेव लग्नासाठी पोहोचला होता. सोबत त्याची बहिण होती. जयमालाचा विधी झाला होता. त्यानंतर मांडवात सात फेरे होणार होते. त्याचवेळी चेहरा पदराने झाकलेली एक स्त्री नवरी मुलीजवळ गेली. तिने एक कागद नवरी मुलीच्या हातात ठेवला. नवरीने त्या कागदावर जे लिहिलय ते पाहिल्यानंतर तिचा संताप अनावर झाला. तिने तिच्या वडिलांना तो कागद दाखवला. त्यानंतर वधू पक्षाच्या मंडळींनी नवरामुलगा आणि त्याच्या बहिणीला बंधक बनवलं. हे सगळं पाहून मांडवात उपस्थित असलेले सगळेच लोक हैराण झाले. काय चाललय हेच त्यांना कळत नव्हतं. उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये एका लग्नात हे सर्व घडलं.
नंतर सगळ्यांना समजल की नवऱ्याच पहिलं लग्न झालं आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचं कोर्ट मॅरेज झालेलं. प्रश्न असा होता की, नवरीच्या हातात कागद देणारी ती मुलगी कोण होती?, ज्यावरुन एवढा सगळा तमाशा झाला. त्या कागदावर असं काय लिहिलेलं?. खरंतर ते कोर्ट मॅरेजच सर्टिफिकेट होतं.
पोलिसांनी काय केलं?
ती मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून नवरदेवाची पहिली पत्नी होती. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तिथे येऊन दोन्ही बाजूंना समजावलं. असं ठरलं की, नवरदेवाच कुटुंब नवरीकडच्या मंडळींना तीन लाख रुपये देईल. लग्नासाठी हा सर्व पैसा खर्च झालेला. त्यानंतर वरात परत माघारी फिरली.
त्याच मांडवात लावलं लग्न
पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही बाजूंच म्हणण ऐकून घेतलं. नवरदेवाच्या पहिल्या पत्नीने खूप गोंधळ घातला. दोन वर्षापूर्वी याने माझ्यासोबत लग्न केलं. आता दुसरं लग्न करतोय. पोलिसांनी मोठ्या कष्टाने तोडगा काढला. मुलीच्या कुटुंबियांनी मग, त्याच मांडवात गावातील दुसऱ्या मुलासोबत मुलीच लग्न लावलं.