बायकोच्या मदतीने 21 वर्षीय प्रेयसीची हत्या, मृतदेह नदीत फेकला, पती-पत्नीसह तिघांना अटक
मोहन आधीपासूनच विवाहित होता. 2019 मध्ये त्याचे लग्न झाले होते. काही दिवस सर्व काही सुरळीत चालले होते, पण जेव्हा सुहागिनीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली, तेव्हा मोहनने तिच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली.
लखनौ : विवाहित तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या (Girlfriend Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील इटावा येथे (Uttar Pradesh Crime) ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्लफ्रेण्डचा गळा कापून तरुणाने तिचा मृतदेह यमुना नदीत (Yamuna River) फेकून दिला. या हत्येत त्याची पत्नी आणि एका मित्राचाही सहभाग होता. ही घटना वैदपुरा परिसरातील खरदूली गावातील आहे. मयत तरुणीचे वडील रामवीर सिंह यांनी सांगितले, की त्यांची 21 वर्षीय मुलगी सुहागिनी 7 फेब्रुवारी रोजी घरातून कुठेतरी गेली आणि परत आलीच नाही. त्यांनी मुलीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कुठेच सापडत नव्हती. त्यानंतर त्यांनी 9 फेब्रुवारी रोजी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस तरुणीचा शोध घेत होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन हा व्यवसायाने जेसीबी चालक असून तो अनेकदा कामानिमित्त खरदूली गावात येत असे. तिथे असतानाच त्याची सुहागिनीशी भेट झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले.
प्रेयसीचा लग्नासाठी तगादा
मोहन आधीपासूनच विवाहित होता. 2019 मध्ये त्याचे लग्न झाले होते. काही दिवस सर्व काही सुरळीत चालले होते, पण जेव्हा सुहागिनीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली, तेव्हा मोहनने तिच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुहागिनीने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे मोहन अस्वस्थ झाला आणि त्याने सगळा प्रकार पत्नीला सांगितला. त्यानंतर राहुल या मित्रासोबत तिघांनी मिळून सुहागिनीला जीवे ठार मारण्याचा कट रचला.
नवरा-बायकोकडून तरुणीची हत्या
7 फेब्रुवारी रोजी मोहनने सुहागिनीला फूस लावून बादपुरा भागातील यमुना नदीवरील रेल्वे पुलावर नेले. तिथे आधीच उपस्थित असलेली मोहनची पत्नी आणि मित्र राहुल यांनी मिळून सुहागिनीचा स्कार्फने गळा आवळून खून केला. यानंतर तिघांनीही चाकूने तिचा गळा कापून शिर धडावेगळे केले. त्यानंतर काही वेळाच्या अंतराने त्यांनी तिचे शीर आणि मृतदेह यमुना नदीत फेकून दिला.
याविषयी माहिती देताना एसएसपी जय प्रकाश सिंह यांनी सांगितले की, तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच त्यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू, मयत तरुणीचे कपडे आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचवेळी मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. मात्र अद्याप मृतदेह हाती लागलेला नाही. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. पुढील तपास अद्याप सुरु आहे.
संबंधित बातम्या :
प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा
एकत्र जीव देऊया, प्रेयसीला भुलवलं, विषारी गोळ्यांनी तरुणीचा मृत्यू, प्रियकर नामानिराळा