चोरांबद्दल भविष्यावाणी करणारा स्वत:च लुटला गेला, बिघडलं सगळंच गणित !
इतरांचं भविष्य पाहणारे आणि सांगणारे हे ज्योतिषी स्वत:चं भविष्य मात्र ओळखू शकलेच नाहीत. हात दाखवण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरांनी त्यांनाच गंडा घातला. या घटनेमुळे शहरात सर्वत्र खळबळ माजली आहे.
मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : भविष्य… काय आहे हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नसतं, पण जाणून घ्यायची बहुतांश लोकांना इच्छा असते. त्यासाठी ते आपला किंवा पत्रिका विश्वासातील गुरूजांनी, ज्योतिषांना दाखवतात. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्येही असेच एक ज्योतिषी खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्याकडे एक दिवस दोन तरूण (चोर) त्यांच्या व्यवसायाची स्थिती जाणून घेण्यासाठी आले. ज्योतिषाने त्यांना सगळं चांगलं, चांगलं सांगितलं. पण त्या तरूणांशी बोलणं त्या ज्योतिषाला फारच महागात पडलं. तिथे नेमकं असं काय घडलं ?
त्या ज्योतिषाच्या ऑफीसमध्ये भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या तरूणांनी त्यालाच गंडा घातला. यानंतर चोरट्यांनी त्यांना कोल्ड्रिंक पाजलं. त्यामुळे ते बेशुद्ध झाले आणि बऱ्याच वेळाने जाग आल्यावर त्या्ंना जे दृश्य दिसलं ते पाहून हक्काबक्का झाले. चोरट्यांनी त्यांच्याच घरात हात साफ केला होता. त्यांनी तेथून रोख रक्कम, मोबाईल आणि दागिने असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला. विशेष म्हणजे हे ज्योतिष महाशय, चोरीच्या घटनांमध्ये विशेष तज्ञ असल्याचं बोललं जातंय. चोर कुठल्या दिशेनं आले आणि कुठल्या दिशेनं गेले हेही ते सांगतात, अशी ख्याती आहे. मात्र त्यांच्या स्वत:च्याच घरात झालेल्या कारनाम्यामुळे ते हतबल झाले आणि पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
शेजाऱ्यांच्या मते मंदिराचे पुजारी पं.तरुण शर्मा यांचे ज्योतिषांमध्ये मोठे नाव आहे. त्यांचे गणित अचूक असते असा दावा केला जातो. विशेषत: चोरीच्या घटनांमध्ये चोरटे कोणत्या दिशेने आले आणि त्यांनी चोरीचा माल कोणत्या दिशेने नेला हेही ते सांगतात. पत्रिका पाहूनच तो लोकांचे भविष्यही सांगतो. आधी ते फक्त देवळात पत्रिका पहायचे, पण आता त्यांनी आपल्या घरातच ऑफिस बनवले आहे.
असा घातला गंडा
सोमवारी या कार्यालयात दोन तरुण पत्रिका दाखवण्यासाठी आले होते. त्यांनीच हा गुन्हा केल्याचे पंडित तरुण शर्मा यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. या दोन्ही तरुणांनी पंडित तरुण शर्मा यांची यापूर्वीही भेट घेतली होती. त्यामुळे सोमवारी ते पुन्हा आल्यावर शर्मा यांनी त्यांना ऑफीसमध्येच बोलावले. त्यांची पत्रिका पाहिल्यानंतर सगळं आलबेल, कुशल असल्याचे त्यांनी तरूणांना सांगितलं. हे ऐकून एक तरुण बाहेर गेला आणि कोल्ड ड्रिंक विकत घेऊन आला. आरोपीने हे कोल्ड्रिंक पहिले त्या पंडितजींना दिले. पण ते पिताच त्यांची शुद्धच हरपली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या खोलीतून साडेचार लाख रुपये रोख, दीड लाख रुपये किमतीचे दोन मोबाइल आणि सुमारे चार लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला.
शुद्धीवर आल्यावर डोक्याला लावला हात
बऱ्याच वेळानंतर पंडित तरुण शर्मा यांना शुद्धीवर आल्यावर त्यांना काय घडलं ते समजलं. त्यांनी सीसीटीव्ही चेक करण्याचा प्रयत्न केला पण जाता-जाता चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही उखडून टाकला होता. हे सर्व पाहून ते ज्योतिषी ओरडू लागले आणि सगळे धावत आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या घरांमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे.