टॉयलेटला जायचंय, बस थांबव…संतप्त कंडक्टरने मजुराला भरधाव बसमधूनच खाली फेकलं आणि…
घरच्यांसोबत दिवाळी साजरी करून तो कामासाठी परत निघाला. टॉयलेटला जायचं असल्याने त्याने कंडक्टरला बस थांबवण्यास सांगितले, पण त्याने नकार दिला. याच मुद्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. रागाच्या भरात कंडक्टरने त्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या बसमधून खाली धक्का दिला आणि...
बरेली | 1 डिसेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील बरेली येथे एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. किरकोळ मुद्यावरून झालेल्या वादातून कंडक्टरने एका मजुराला भरधाव वेगाने जाणाऱ्या बसमधून खाली फेकले. त्या बसच्या चाकाखाली येऊन मजुराचा जागीच मृत्यू झाला. जयपूरच्या दिशेने जाणारी ही बस डबलडेकर होती. या घटनेनंतर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर नागरिकांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. घटनास्थळ गाठून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत चो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मात्र या घटनेनंतर आरोपी कंडक्टर आणि बसचा चालक दोघेही फरार असल्याचे समजते.
दिवाळीसाठी घरी आलेला तो कामावर परत निघाला पण…
विजयपाल असे मृत मजुराचे नाव असून तो पीलीभीतच्या जेहानाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील रामनगर गावचा रहिवासी आहे. दिवाळीसाठी तो घरी आला होता. सुट्टी संपवून तो राजस्थानमधील जयपूरला कामासाठी परत जात होता. कुटुंबियांसह तो एका खासगी कंपनीच्या डबल डेकर बसमध्ये चढला. मध्यरात्रीच्या सुमारास ती बस बरेली येथे पोहोचली. तेव्हा विजयपाल याला टॉयलेटला जायचं होतं. त्यासाठी त्याने कंडक्टरला बस थांबवण्यास सांगितले, पण त्याने बस रोखण्यास नकार दिला.
राहणारा विजयपाल दिवाळीला घरी आला होता. ते राजस्थानमधील जयपूर येथे मजुरीच्या कामासाठी घरून जात होते. विजयपाल आपल्या कुटुंबासह जयपूरला डबल डेकर खासगी बसने निघाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा बस बरेलीला आली आणि विजयपालला वाटेत लघवीचा त्रास जाणवला. कंडक्टरला बस थांबवण्यास सांगितल्यावर त्याने बस थांबवण्यास नकार दिला.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पण विजयपाल हा बस थांबवण्यासाठी आग्रह करू लागला. आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. अखेर बरेलीच्या पीलीभीत बायपासजवळ बस पोहोचताच कंडक्टरने विजयपालला जोरात धक्का दिला. तो थेट रस्त्यावर पडला आणि बसच्या मागच्या चाकाखाली आला. भरधाव वेगाने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली चिरडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या पतीला रक्तबंबाळ अवस्थे पाहून त्याच्या पत्नीच्या पायाखालची तर जमीनच सरकली. रस्त्यावरून जाणारे इतर लोकही हा प्रकार पाहून हादरले, कोणीतरी लगेचच पोलिसांना कळवले. तोपर्यंत कंडक्टर आणि बसचालक मात्र तेथून फरार झाले. पोलिसांनी विजयपाल याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
संतप्त लोकांची बसवर दगडफेक
कंडक्टरच्या या वागण्यामुळे एका मजुराचा हकनाक जीव गेला आणि आजूबाजूला जमलेले लोक संतापले. मजुराच्या मृत्यूनंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. संतप्त लोकांनी त्या बसवर दगडफेक केली. विजयपाल याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला कंडक्टर आणि बस चालकाला अटक करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली. पोलिसांनी कसेबसे लोकांना समज देऊन शांत केले.
दरम्यान घटनास्थळावरून मृत मजून विजयपाल याचे सामान आणि मोबाईल गायब झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.