जिस थाली में खाया उसीमें… सहकाऱ्याच्याच अल्पवयीन मुलीवर केले वार, स्थानिकांनी आरोपीला चोपलं !
अल्पवयीन विद्यार्थिनी गुरुवारी दुपारी ४ वाजता घरातून शिकवणीसाठी जात होती. त्यानंतर अचानक मागून आलेल्या हल्लेखोराने तिच्यावर थेट हल्ला केला. स्थानिकांनी हे पाहताच त्याला पकडले आणि बेदम चोप दिला. जखमी विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गाझियाबाद | 6 ऑक्टोबर 2023 : रोजच्याप्रमाणे ती दुपारच्या सुमारास क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली. थोडं अंतर चालली न चालली तोच मागून कोणीतरी धावत येत असल्याचा आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर वडिलांचा सहकारी मागे होता. त्याला पाहून ओळखीचं हसू चेहऱ्यावर येणार तोच, तिची नजर त्याच्या हातातील वस्तूवर गेली आणि भीतीने तिचे डोळेच विस्फारले. क्षणात मागे वळून तिने पळायला सुरूवात केली, मात्र त्याने मागूनच तिच्यावर हल्ला करत तलवारीने वार करून तिला जखमी केले.
एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा थरार प्रत्यक्षात घडला, तोही दिवसाढवळ्या. ९ वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार करण्यात आल्याची हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. गाझियाबादच्या मोदीनगर भागात हा थरारक प्रसंग घडला. या घटनेत ती बिचारी मुलगी गंभीर जखमी झआली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिच्या किंकाळ्या ऐकून आजाबाजूचे धावत आले आणि ३५ वर्षांच्या आरोपीला तिथेच पकडले आणि बेदम चोप देऊन मगच पोलिसांच्या हवाली केले.
मोदीनगर येथील जगतपुरी भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी गुरुवारी दुपारी ४ वाजता घरातून शिकवणीसाठी जात होती. त्यानंतर अचानक मागून आलेल्या हल्लेखोराने तलवार घेऊन तिच्यावर थेट हल्ला केला. त्यामध्ये ती अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला, हाताला, पायांना आणि शरीराच्या इतर भागावर गंभीर मार लागला, खूप रक्तस्त्रावही झाला. मात्र या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक लोकांनी त्या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केले.
9 वीतल्या विद्यार्थिनीवर तलवारीने हल्ला
पीडिता सध्या 9वीमध्ये शइकत आहेच. या वादाचे कारण, हे का घडले , याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, असे तिचे वडील, संजय यांनी सांगितले. हा हल्ला नेमका का झाला, याचे कारण आपली लेकच सांगू शकेल. पण सध्या तिची प्रकृती बरी होणं महत्वाचं आहे. रुग्णालयात ती वेदना सहन करत तळमळत आहे, तिला बरं वाटल्यावर या सर्व गोष्टींचे कारण समजू शकेल, असे ते म्हणाले. तिच्यावर मागून हल्ला करण्यात आला. हा प्रकार परिसरातील लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरोपीवर विटा फेकल्या. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण स्थानिकांनी त्याला रोखले.
आरोपीला अटक
विशेष म्हणजे हल्लेखोर त्यांच्या ओळखीचाच आहे. तो पीडितेच्या वडिलांसोबत काम करतो, अशी माहिती तपासात समोर आली आहे. तो त्यांच्या घरीही यायचा, कधी त्यांच्यासोबत जेवायचाही. त्यांची चांगली ओळख होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने हा हल्ला का केला, याची कसून चौकशी करण्यात येत आहे.