कानून के हाथ..! मित्र, सावत्र आई आणि 3 भावंडांचा खून पचवून जगत राहिला; अखेर 17 वर्षांनी…
वसई गुन्हे शाखेने १७ वर्षांपूर्वी झालेल्या एका निर्घृण हत्येचा उलगडा केला आहे. निरंजन शुक्ला नावाच्या आरोपीला कर्नाटकातून अटक करण्यात आली. त्याने आपल्या मित्रासह सावत्र आई आणि तीन अल्पवयीन भावंडांची हत्या केली होती. किरकोळ वादातून मित्राची हत्या झाली होती. हा आरोपी अनेक वर्षे फरार होता आणि त्याने आपली ओळख लपवून ठेवली होती.

जीवलग मित्र, सावत्र आई आणि 3 सावत्र निरागस अल्पवयीन भावंडांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या सराईत मुख्य आरोपीला 17 वर्षांनंतर बेड्या ठोकण्यात आल्या आणि कानून के हाथ बहोत लंबे होते… या डायलॉगचा खरोखर प्रत्यय आला. वसई गुन्हे शाखेच्या युनिट 02 पथकाने हे निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला कर्नाटकच्या बंगळुरू येथून बेड्या ठोकल्या. निरंजनकुमार उर्फ रंजन उर्फ राजू उर्फ अक्षय विजय शुक्ला (वय 40) असे आरोपीचे नाव हे.
27 मार्च 2008 मध्ये वसईच्या चिंचपाडा वालीव परिसरात निरंजनने आपल्या जवळच्या मित्राची हत्या केली होती. त्यानंत आरोपी आपली ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी फरार होत होता. याबाबत वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, 17 वर्षा नंतर मोठ्या शिताफीने हा सराईत आरोपी अटक करण्यात आला आहे. काल ( शुक्रवार, 21 मार्च) त्याला वसई न्यायालयात हजर केले असता 27 मार्च पर्यंत 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
किरकोळ वादातून मित्राला संपवलं
निरंजनकुमार उर्फ रंजन उर्फ राजू उर्फ अक्षय विजय शुक्ला असे आरोपीचे नाव असून हा मूळचा बिहारचा राहणारा आहे तर सध्या तो कर्नाटक राज्यातील बंगळुरूमधील महादेवपुरा येथे राहत होता. या आरोपीने 27 मार्च 2008 रोजी 25 वर्षांचा जिवलग मित्र मनोज राजबिहारी शहा याची किरकोळ वादातून, डोके भिंतीवर आढळून आणि दोरीने गळा आवळून हत्या केली होती. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने जुन्या गुन्ह्याचा उकल करण्यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयच्या वरिष्ठ अधिकारी यांनी आदेश दिले होते. माणिकपूर पोलीस ठाण्यातील 17 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा तपास हा वसई गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी समीर आहिरराव, सपोनि सोपान पाटील आणि सागर शिंदे यांचे पथक करीत होते.
सावत्र आई आणि भावंडांचाही घेतला जीव
या गुन्ह्याचा तांत्रिक पद्धत्तीने तपास केला असता आरोपी हा आपली ओळख लपविण्यासाठी त्याचे नाव, पुरावे बदलून वास्तव्य करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पण वसईत ज्यावेळी हत्या झाली त्यावेळेचे सर्व पुरावे, त्याचे सहकारी, काम करीत असलेली कंपनी, शेजारी याचा शोध घेऊन, गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथून आरोपीला अटक करण्यात यश मिळविले.या आटोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने फक्त त्याच्या मित्राचाच नव्हे तर त्याची सावत्र आई आणि 3 सावत्र अल्पवयीन निरागस भावंडांचाही जीव घेतल्याचे उघड झाले.
या आरोपी विरोधात मित्राच्या हत्ये प्रकरणी वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात तर सावत्र आई आणि सावत्र भावंड यांच्या हत्या प्रकरणात पश्चिम बंगाल च्या मेडिनीपूर जिल्ह्यातील हलदिया पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहेत. काल आरोपीला कर्नाटक बंगळुरूमधून अटक करून शुक्रवारी वसई न्यायालयात हजर केल्यानंतर 27 मार्च पर्यंत 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तब्बल 17 वर्षांनी या गुन्ह्याची उकल होऊन आरोपीला शोधण्यात वसई युनिट 2 ला यश मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी
निरंजनकुमार उर्फ राजू ऊर्फ अक्षय विजय शुक्ला हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, मारामारी, दरोडे आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो उत्तर बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी असून, त्याने अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करून स्वतःची ओळख लपवली होती. हलीदिया येथील हत्येनंतर तो बिहार, महाराष्ट्र आणि नंतर कर्नाटकमध्ये स्थायिक झाला होता.