‘मला, माझ्या मुलाला, माझ्या पतीला काहीही होऊ शकतं’, कल्याणमध्ये पीडित कुटुंब दहशतीखाली
कल्याण अल्पवयीन मुलीची हत्या आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्याने या घटनेआधी देखील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. त्या घटनेतील पीडित कुटुंब आजदेखील दहशतीखाली आहे. पीडितेच्या आईने आज याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेतील आरोपी विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने याआधी अनेक गुन्हे केल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे याच विशाल गवळीने याआधी केलेल्या दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचारातील कुटुंब अजूनही दहशतीखाली आहे. त्यावेळेला कठोर कारवाई केली असती तर एका मुलीचा जीव वाचला असता, असं पीडित मुलीची आई म्हणाली आहे. यापुढे त्याला फाशी किंवा त्याचा एन्काऊंटर करा. परिसरातील अनेक मुलींचे जीव वाचवा. माझ्या मुलीचा रस्ता आम्ही बंद केला आहे. त्याचं कुटुंब तिकडे राहायलाच नको, अशी विनंती पीडित मुलीच्या आईने केली आहे. पीडित मुलीच्या आईने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी आपले कुटुंबिय अजूनही दहशतखाली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी अटकेत असलेला नाराधम विशाल गवळीवर याआधीचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. या ८ गुन्ह्यांपैकी २ विनयभंग आणि १ लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. २०२३ मध्ये नराधम विशाल गवळीने एका शाळकरी अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी नराधम विशाल गवळी विरोधात पीडित मुलीच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यावेळी देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केली होती, असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.
आरोपी विरोधात बोलायला कोणीही पुढे येत नाही
विशाल गवळीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून देखील तो दोन महिन्यांत तुरुंगातून बाहेर आला होता. या घटनेतील पीडित कुटुंबीय आजही दहशतीखाली आहेत. नराधम विशालची दहशत इतकी आहे की, त्याच्या विरोधात बोलायला कोणीही पुढे येत नाही. परिसरामध्ये छेडछाड, विनयभंग, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्याने अनेकांसोबत केले आहेत. विशाल विरोधात जर कोणी बोललं तर तो आपल्याला सोडणार नाही, अशी भीती स्थानिकांना आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
“नराधम विशाल गवळीवर त्याच वेळेला कठोर कारवाई जर केली असती तर ही घटना घडली नसती. आता मी माध्यमांसमोर बोलतेय. तर मला भीती आहे. मला, माझ्या मुलाला, माझ्या पतीला काहीही होऊ शकतं. त्याचा एन्काऊंटर करा. त्याला फाशी द्या आणि परिसरातील आणखी मुलींचे जीव वाचवा”, अशी प्रतिक्रिया २०२३ मध्ये घडलेल्या घटनेतील पीडित मुलीच्या आईने दिली आहे.