औरंगाबाद : महाराष्ट्राच्या विकासाला नवीन दिशा देणाऱ्या नागपूर येथील समृद्धी महामार्गावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने या महामार्गावर उभे राहून हवेत गोळीबार केल्याची घटना उजेडात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. हा तरुण मनोविकृत आहे का? किंवा त्याने गोळीबाराची स्टंटबाजी केली आहे का? या अनुषंगाने सध्या घटनेचा पुढील पोलीस तपास सुरू असल्याचे समजते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जात आहे.
या महामार्गाचे उद्घाटन होऊन काही दिवस उलटत नाही तोच वेगवेगळ्या धक्कादायक प्रकार घडण्याची मालिका सुरू आहे. तरुणाने हवेत गोळीबार करून नेमके काय साध्य केले? असा सवाल सोशल मीडियामध्ये उपस्थित केला जात आहे.
या तरुणाची ओळख अद्याप पटली नाही. या दोन-तीन दिवसातच हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. पोलीस या तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. मात्र त्याची सत्यता कितपत आहे, याचा देखील शोध सुरू आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये गोळीबार करणारा तरुण हा एका स्कॉर्पिओ गाडीसमोर उभा आहे. तसेच घटनेच्या परिसरात एक बोगदा देखील दिसत आहे. यावरून घटनास्थळाचा शोध घेत घटनेची सत्यता पडताळली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बोगदा हा औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी परिसरातील असल्याचे समजते. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून प्रकल्पाच्या यशस्वीततेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
याचदरम्यान सुरुवातीला बैलगाड्यांचा ताफा महामार्गावरील चालण्याचा फोटो शेअर झाला. त्यानंतर आता महामार्गावर उभा राहून एक तरुण गोळीबार करीत असल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे. या लागोपाठ घडलेल्या घटनांवरून समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीलाच अशा घटनांचे सत्र कसे काय सुरू झाले आहे, असा प्रश्न सर्वसामान्य वाहनधारकांकडून केला जात आहे.