डोंबिवलीत चाललंय काय?, मध्यरात्रीच्या सुमारास खुलेआम रिक्षा चालकांची भररस्त्यात हुक्का पार्टी
सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहराची आता गुन्हेगारांचे शहर अशी ओळख बनत आहे. खुलेआम गुन्हेगार गुन्हे करत आहेत.
डोंबिवली : सुसंस्कृत आणि सुशिक्षित अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसून येतेय. डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात दोन रिक्षा चालकांनी भर रस्त्यात हुक्का पित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच डोंबिवली रामनगर पोलीस लगेचच अॅक्शन मोडवर आले. पोलिसांनी अवघ्या काही तासात एका रिक्षा चालक्याला ताब्यात घेतले आहे. अक्षय पवार असे या रिक्षा चालकाचे नाव असून, त्याच्या जोडीला असलेल्या दोघांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
हुक्का पिताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
काल मध्यरात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात भर रस्त्यात तीन जण हुक्का पित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच रामनगर पोलिसांनी नेमका हा व्हिडीओ कुठला आहे याचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासात रामनगर पोलिसांना हुक्का पिणाऱ्यापैकी एका आरोपीचा शोध लावण्यात यश आले. भर रस्त्यात हुक्का पिणारा अक्षय पवार या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याच्या जोडीला असणारे दोन रिक्षा चालक सूरज साळुंके आणि अन्य एक आरोपीचा शोध रामनगर पोलीस घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, काल मध्यरात्री दोनच्या सुमारास डोंबिवली पूर्व स्टेशनच्या बाजूला रस्त्यात अक्षय हा आपला मित्र सुरज साळुंखे आणि अन्य एक रिक्षा चालकासोबत स्टेशन परिसरात आला. स्टेशनच्या बाजूला भर रस्त्यात त्याने हुक्का पेटवत हुक्का मारण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे सांस्कृतिक शहरात एकच खळबळ माजली आहे.