वडिलांच्या उपचारासाठी त्याने शक्कल लढवली, वडिलांचे प्राण वाचले पण त्याला झाली अटक
वडिलांच्या आजाराचा खर्च करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने मुलाने चोरीचा मार्ग पत्करल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी मुरबाड येथून चोरट्याला अटक केली आहे.
डोंबिवली / सुनील जाधव : डोंबिवली विष्णूनगर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला मुरबाड येथून अटक केली आहे. वैभव मुरबाडे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी वैभव जवळून चोरी केलेला 5 लाख 92 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. वडिलांच्या आजारपणाचा, उपचाराचा खर्च करण्यासाठी पैसे नसल्याने मुलाने चोरीचा मार्ग पत्करला. यासाठी वैभवने घरफोडी करत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितले असून, पुढील तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत.
डोंबिवलीतील एका घरात दागिन्यांची चोरी केली
डोंबिवली पश्चिमेकडील एका इमारतीमधील घरातील कपाटात ठेवलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरटा अटक
सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा चोरटा मुरबाड येथे राहत असल्याची माहिती विष्णुनगर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी वैभव मुरबाडे याला मुरबाड येथून अटक केली. तसेच त्याच्याकडून 5 लाख 92 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वडिलांच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने केली चोरी
वडील आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने चोरी करणे सुरू केल्याचे वैभवने पोलिसांना सांगितले. दरम्यान याआधी देखील त्याच्यावर एक गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वैभवने आणखी काही चोऱ्या केल्यात का याचा तपास आता विष्णुनगर पोलीस करत आहेत.